मुंबई / प्रतिनिधी
राज्यातील जिल्हा परिषद निवडणुका लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी प्रचाराचा वेग प्रचंड वाढवला असून राज्यभरात त्यांच्या तीसहून अधिक जाहीर सभा आणि रोड शो आयोजित करण्यात आले आहेत. विधानसभा व लोकसभा निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीतही शिवसेनेने (शिंदे गट) प्रभावी आणि नियोजनबद्ध प्रचाराची रणनीती आखली आहे.
शिवसेनेच्या वतीने यावेळी निवडणूक प्रचारासाठी मायक्रो प्लॅनिंग करण्यात आले असून प्रत्येक जिल्हा, तालुका आणि मतदार संघाचा सखोल अभ्यास करून सभांचे नियोजन केले जात आहे. स्थानिक प्रश्न, विकासकामे, कार्यकर्त्यांचे संघटन आणि उमेदवारांची ताकद लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सभा आणि रोड शो निश्चित करण्यात आले आहेत.
शिंदे शिवसेनेच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागातील मतदारांपर्यंत थेट पोहोचण्यासाठी रोड शोवर विशेष भर देण्यात आला आहे. या माध्यमातून विकासकामांची माहिती, सरकारच्या योजनांचा आढावा आणि स्थानिक उमेदवारांच्या समर्थनार्थ थेट जनसंवाद साधला जाणार आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात यश मिळेल, असा विश्वास शिवसेना नेत्यांकडून व्यक्त केला जात असून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सभांमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. येत्या काही दिवसांत राज्यातील विविध जिल्ह्यांत प्रचाराचा हा धडाका अधिक तीव्र होणार असल्याचे चित्र आहे.







