मालवण : युवक व क्रीडा संचालनालय, महाराष्ट्र राज्य आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल, मालवण येथे आयोजित तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल, देवबागच्या दोन विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली.
बाल गटातील मुलांच्या ३८ किलो वजनी गटात प्रशालेतील इयत्ता सातवीचा विद्यार्थी संकल्प कमलाकर खोबरेकर याने उत्कृष्ट पकड, डावपेच आणि कौशल्याच्या जोरावर प्रतिस्पर्ध्यांवर मात करत प्रथम क्रमांक पटकावला.
तर बाल गटातील मुलींच्या ५० किलो वजनी गटात इयत्ता सहावीची विद्यार्थिनी मनस्वी उत्तम राऊळ हिनेही आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली आणि प्रथम क्रमांक मिळविला. या दोन्ही खेळाडूंची आता जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका रचना रुपेश खोबरेकर, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, तसेच अखिल देवबाग विकास मंडळ, मुंबईचे पदाधिकारी, सदस्य आणि ग्रामस्थांनी संकल्प खोबरेकर व मनस्वी राऊळ यांचे अभिनंदन केले. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी दोन्ही खेळाडूंना शुभेच्छा देण्यात आल्या.






