सिया परब द्वितीय, योगिता जोशी तृतीय; वेद कुबल चौथा
मालवण, दि. प्रतिनिधी : क्रीडा व युवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग, जिल्हा क्रीडा परिषद, सिंधुदुर्ग आणि मालवण क्रीडा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने वराड हायस्कूल, वराड येथे आयोजित करण्यात आलेल्या मालवण तालुकास्तरीय शालेय बुद्धिबळ स्पर्धेत मालवण-वायरी भूतनाथ येथील रेकोबा माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी केली.
या स्पर्धेत १९ वर्षांखालील मुलींच्या गटात विद्यालयाची विद्यार्थिनी सिया गणेश परब हिने द्वितीय क्रमांक, तर योगिता रामचंद्र जोशी हिने तृतीय क्रमांक पटकावला. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात वेद प्रवीण कुबल याने चतुर्थ क्रमांक मिळविला.
या तिन्ही विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विद्यार्थ्यांना क्रीडाशिक्षक श्रीनाथ फणसेकर आणि प्रवीण कुबल यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्था पदाधिकारी, शालेय समिती पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय खोचरे, पालक-शिक्षक संघाचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, माजी विद्यार्थी, पालक आणि विद्यार्थीवृंद यांनी अभिनंदन केले असून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.







