कणकवली (प्रतिनिधी)
गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून उबाठा शिवसेनेचे कणकवली विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन आपण ठाकरे शिवसेनेला जय महाराष्ट्र करत असल्याची अधिकृत घोषणा केली. आपण पक्षाचे कणकवली विधानसभा प्रमुख पद सोडले असून याबाबतचे रीतसर राजीनामापत्र पक्षाचे सचिव विनायक राऊत यांच्याकडे पाठविल्याची माहिती त्यांनी दिली.
आपल्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. सावंत म्हणाले की, जिल्ह्यातील विकासाचे अनेक प्रश्न प्रलंबित असून ते सत्तेच्या माध्यमातूनच मार्गी लागू शकतात. त्यामुळे कार्यकर्ते आणि समर्थकांशी चर्चा करून येत्या दोन दिवसांत पुढील राजकीय निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सतीश सावंत पुढे म्हणाले, “मी २०१९ साली शिवसेनेत प्रवेश केला आणि सध्या उबाठा शिवसेना पक्षामध्ये कार्यरत होतो. या काळात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह पक्षातील सर्व नेत्यांनी मला चांगले सहकार्य केले. त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे.”
आपल्या भूमिकेचे स्पष्टीकरण देताना ते म्हणाले की, सहकार क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत असल्यामुळे जिल्हाभरातील नागरिक विविध समस्या घेऊन माझ्याकडे येत असतात. मात्र शासन स्तरावरील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेच्या प्रवाहात असणे गरजेचे आहे, अशी विनंती अनेक ज्येष्ठ नागरिक आणि कार्यकर्त्यांनी आपल्याकडे केली होती.
“जिल्ह्यात विकासाचे अनेक प्रश्न असून ते प्रभावीपणे सोडविण्यासाठी सत्तेत सहभागी होणे आवश्यक आहे. त्यामुळेच उबाठा शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आहे. जो पक्ष विकासाचे प्रश्न सोडविण्याची ठोस हमी देईल, त्याच पक्षात प्रवेश करणार आहे,” असेही सतीश सावंत यांनी यावेळी स्पष्ट केले.
सावंत यांच्या या निर्णयामुळे कणकवलीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू असून त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







