गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त २० सप्टेंबरला दादरमध्ये विशेष कार्यक्रम
मुंबई : गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यानिमित्त महाराष्ट्राच्या विविध भागांतील लोकपरंपरा, लोककला आणि सांस्कृतिक वारसा रसिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ‘येवा येवा शिरी गनेस देवा’ या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
रविवार, २० सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ४ वाजता दादर येथील छत्रपती शिवाजी मंदिरात हा कार्यक्रम रंगणार आहे. या कार्यक्रमातून मालवणी मुलुखातील गणेशोत्सवाची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा, गीत-संगीत आणि पारंपरिक लोककलांची अनुभूती रसिकांना घेता येणार आहे.
कार्यक्रमासाठी गीत रचना व संहिता महेश केळुसकर, संगीत मिथिलेश पाटणकर, तर अभिसंवाद सुप्रिया विनोद मंगेश सातपुते यांचे आहे. मालवणी गणेशोत्सवातील पारंपरिक सांस्कृतिक वातावरण उलगडणाऱ्या या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून ‘गावचे भजन’ सादर करण्यात येणार आहे.
मालवणी संस्कृतीतील लोकपरंपरा आणि लोककलेचे दर्शन घडविणारा हा सांस्कृतिक सोहळा रसिकांसाठी विनामूल्य खुला आहे. मुंबईतील तसेच महाराष्ट्राच्या विविध भागांतील रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक प्रशांत खेडेकर यांनी केले आहे.







