सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ कोटी ६८ लाख ९६ हजार ८०७ रुपयांची तडजोड
सिंधुदुर्ग, दि. १२ (जिमाका) : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीत एकूण ६४८ प्रकरणे तडजोडीच्या माध्यमातून निकाली काढण्यात आली. या प्रकरणांमध्ये एकूण २ कोटी ६८ लाख ९६ हजार ८०७ रुपयांची तडजोड झाली.
राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा न्यायालयात दोन, तर जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमध्ये सात पॅनेलची नियुक्ती करण्यात आली होती. जिल्हा न्यायालयातील पॅनेल क्रमांक १ मध्ये जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. टी. त्रिपाठी तसेच विधीज्ञ सुमन गावडे यांनी काम पाहिले. पॅनेल क्रमांक २ मध्ये तिसरे सह दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एस. पी. पाटील तसेच विधीज्ञ तेजल कुडतरकर यांनी काम पाहिले. जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव आर. व्ही. नडगदल्ली हेही उपस्थित होते.
या लोक अदालतीमध्ये जिल्हा न्यायालयासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व तालुका न्यायालयांमधील तडजोडीस पात्र प्रकरणे ठेवण्यात आली होती. यामध्ये दिवाणी दावे, तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, बँक वसुली प्रकरणे, मोटार अपघात भरपाई प्रकरणे, वीज देयक प्रकरणे, कौटुंबिक वाद तसेच विविध वादपूर्व प्रकरणांचा समावेश होता.
या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये ३३९ वादपूर्व प्रकरणे आणि ३०९ दाखल प्रकरणे, अशी एकूण ६४८ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. पक्षकार तसेच विधीज्ञांनी लोक अदालतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्यासाठी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांतील न्यायिक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुमारे दोन महिन्यांपासून नियोजनबद्ध पद्धतीने परिश्रम घेतले. पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही आयोजनासाठी सहकार्य केले.
लोक अदालतीच्या माध्यमातून परस्पर संमती आणि तडजोडीने प्रकरणांचा निकाल लागल्याने संबंधित पक्षकारांमधील सामंजस्य व जिव्हाळा टिकून राहण्यास मदत होते. तसेच लोक अदालतीतील तडजोडीच्या निकालाविरुद्ध अपीलाची तरतूद नसल्याने पक्षकारांचा वेळ आणि खर्चही वाचतो.







