कणकवली :
कणकवलीच्या लेकीने देशपातळीवर घवघवीत यश मिळवत कोकणासह महाराष्ट्राचा अभिमान वाढवला आहे. केंद्र सरकारच्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा 5.0’ या अत्यंत प्रतिष्ठेच्या राष्ट्रीय शालेय उपक्रमात देशभरातील तब्बल दोन कोटी विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या केवळ १०० विजेत्यांमध्ये कणकवलीची कोकणकन्या सावी मुद्राळे हिने आपले नाव कोरले आहे. विशेष म्हणजे या १०० विजेत्यांमधून पहिल्या १० क्रमांकांत सावीचा समावेश झाला असून, ही कामगिरी कोकणच्या मातीतील संस्कार, मेहनत आणि जिद्दीचे प्रतीक ठरली आहे.
सावी मुद्राळे हिच्या या स्तुत्य यशामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राची मान अभिमानाने उंचावली आहे. देशाच्या शूरवीर सैनिकांच्या पराक्रमाची ओळख करून देणाऱ्या ‘प्रोजेक्ट वीर गाथा’ उपक्रमात मिळवलेले हे यश केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण कोकणासाठी गौरवास्पद आहे.
या यशाची दखल घेत येत्या २६ जानेवारी २०२६ रोजी राजधानी दिल्ली येथे माननीय केंद्रीय संरक्षण मंत्री श्री. राजनाथ सिंह यांच्या हस्ते सावीचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. तसेच प्रजासत्ताक दिनानिमित्त लाल किल्ल्यावरून होणारी ऐतिहासिक परेड पाहण्यासाठी सावीला ‘विशेष अतिथी’ म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे.
कोकणच्या एका छोट्याशा घरातून दिल्लीच्या लाल किल्ल्यापर्यंतचा सावीचा हा प्रेरणादायी प्रवास प्रत्येक मुलीच्या स्वप्नांना नवी दिशा देणारा असून, शिक्षण, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर कोणतेही स्वप्न साकार होऊ शकते, याचे उत्तम उदाहरण ठरत आहे.
https://www.instagram.com/reel/DTzAX5bE7fq/?utm_source=ig_web_copy_link&igsh=MzRlODBiNWFlZA==







