कुडाळ | प्रतिनिधी :
कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दाखल झालेल्या नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया आज तहसीलदार कार्यालयात पार पडली. या छाननीत जिल्हा परिषदेच्या प्राप्त ४८ उमेदवारी अर्जांपैकी ४३ अर्ज वैध तर ५ अर्ज अवैध ठरविण्यात आले. पंचायत समितीच्या प्राप्त ६४ अर्जांपैकी सर्व उमेदवारी अर्ज वैध ठरले. जिल्हा परिषद व पंचायत समिती मिळून एकूण ११२ अर्जांपैकी १०७ अर्ज वैध ठरले आहेत.
या छाननी प्रक्रियेत अपक्ष बंडखोर उमेदवार वर्षा कुडाळकर यांचे तेंडोली व पिंगुळी या दोन्ही जिल्हा परिषद मतदारसंघांतील उमेदवारी अर्ज अवैध ठरविण्यात आले. तसेच पिंगुळी जिल्हा परिषद मतदारसंघातील अंकुश रामा जाधव (वंचित बहुजन आघाडी), कल्पेश काशिनाथ मसके (अपक्ष) आणि पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातील रामदास गोपाळ ठाकूर (अपक्ष) यांचेही अर्ज अवैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
छाननी प्रक्रियेदरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी ऐश्वर्य काळुसे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटील, संजय गवस, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगरूम आदी अधिकारी उपस्थित होते. यावेळी सर्व उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महायुतीतील जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर नाराज झालेल्या वर्षा कुडाळकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देत पिंगुळी व तेंडोली मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले होते. मात्र छाननी प्रक्रियेत त्यांचे दोन्ही अर्ज बाद ठरल्याने आता त्यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता उमेदवारी अर्ज माघारीच्या टप्प्याकडे राजकीय हालचाली वेग घेण्याची शक्यता आहे.





