५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २७३, पंचायत समितीच्या १०० जागांसाठी ४४० अर्ज
मात्तबर उमेदवारांना पक्षांने उमेदवारी नाकारल्याने बंडखोर अपक्षांची संख्या लक्षणीय
अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी तहसील कार्यालयांमध्ये प्रचंड गर्दी
सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक उमेदवारी अर्जांची नोंद
सावंतवाडीत जि. प.च्या ९ जागांसाठी ६० उमेदवार मैदानात
पं. स.च्या १८ जागांसाठी सावंतवाडीत १०१ इच्छुकांनी दाखल केले अर्ज
कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली तालुक्यांतही लढत चुरशीची होण्याची चिन्हे
मालवण, देवगड, दोडामार्गमध्येही अपक्ष व पक्षीय उमेदवारांची रेलचेल
उमेदवारी अर्ज छाननीनंतर खरे चित्र स्पष्ट होणार
सिंधुदुर्गनगरी – जिल्हा प्रतिनिधी
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या येत्या ५ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बुधवारी जिल्हाभरात उमेदवारांची अक्षरशः गर्दी उसळल्याचे चित्र पाहायला मिळाले. जिल्हा परिषदेच्या ५० जागांसाठी २७३ तर पंचायत समितीच्या १०० जागांसाठी तब्बल ४४० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले असून, एकूण १५० जागांसाठी ७१३ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
बऱ्याच कालावधीनंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत असल्याने इच्छुकांचा उत्साह प्रचंड वाढलेला दिसून आला. विशेषतः उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी सर्व तालुक्यांतील तहसील कार्यालयांमध्ये इच्छुक उमेदवार व त्यांच्या समर्थकांची मोठी गर्दी झाली होती.
तालुकानिहाय पाहता सावंतवाडी तालुक्यात सर्वाधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सावंतवाडीत जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी ६० तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी १०१ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.वैभववाडी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी १५ तर पंचायत समितीच्या ६ जागांसाठी २७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. कणकवली तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ८ जागांसाठी ३७ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० अर्ज दाखल झाले आहेत. देवगड तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ७ जागांसाठी २७ तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ३७ उमेदवार रिंगणात उतरले आहेत.मालवण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ६ जागांसाठी २८ तर पंचायत समितीच्या १२ जागांसाठी ५३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९ जागांसाठी ४८ तर पंचायत समितीच्या १८ जागांसाठी ६४ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. वेंगुर्ला तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ५ जागांसाठी ३७ तर पंचायत समितीच्या १० जागांसाठी ६२ अर्ज दाखल झाले आहेत. दोडामार्ग तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ३ जागांसाठी २१ तर पंचायत समितीच्या ६ जागांसाठी ३६ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आणि माघारीनंतर खऱ्या लढतीचे चित्र स्पष्ट होणार असून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.





