कणकवली | प्रतिनिधी
कणकवली तालुक्यातील बीडवाडी पंचायत समिती निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाला मोठा धक्का बसला असून भाजपच्या विजयाचा पहिला नारळ फुटला आहे. अर्ज छाननीदरम्यान उबाठा शिवसेनेच्या उमेदवार विद्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवण्यात आला.
भाजपकडून विद्या शिंदे यांच्याविरोधात तीन अपत्य या अटीसंदर्भात हरकत दाखल करण्यात आली होती. या हरकतीवर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुनावणी घेतल्यानंतर नियमांनुसार विद्या शिंदे यांचा अर्ज रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे बीडवाडी पंचायत समिती निवडणुकीत उबाठा शिवसेनेला निवडणुकीआधीच मोठा धक्का बसला.
उमेदवारी अर्ज अवैध ठरल्यामुळे बीडवाडी पंचायत समितीतून भाजपच्या सौ. संजना राणे यांचा विजय घोषित करण्यात आला. त्यांच्या विजयानंतर कणकवलीत भाजप कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी, घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.
या विजयामुळे कणकवली तालुक्यात भाजपची राजकीय ताकद अधिक मजबूत झाल्याचे चित्र असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी हा विजय महत्त्वाचा मानला जात आहे.






