कट्टा : बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा येथे थोर समाजसेवक व संसदपटू बॅ. नाथ पै यांची ५५ वी पुण्यतिथी विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी बॅ. नाथ पै यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
प्रास्ताविकात दीपक भोगटे यांनी बॅ. नाथ पै सेवांगणतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांचा आढावा घेतला. ही स्पर्धा सलग ५१ व्या वर्षी आयोजित करण्यात आली असून १८ प्रकारच्या विविध स्पर्धांमध्ये १००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला आहे. यामधून २१० विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. १९७५ पासून सातत्याने सुरू असलेल्या या उपक्रमासाठी शिक्षक, विद्यार्थी व पालकांचे त्यांनी आभार मानले. तसेच प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक दीपक गावडे हे चार वेळा पुणे महानगरपालिकेत निवडून आले असून निस्पृह, प्रामाणिक व निष्कलंक चारित्र्याचे नेतृत्व म्हणून त्यांचे विशेष कौतुक केले. कोकण रेल्वेसाठी बॅ. नाथ पै यांनी आपल्या कारकिर्दीत अथक प्रयत्न केले तसेच उत्कृष्ट संसदपटू म्हणून त्यांनी देशपातळीवर लौकिक मिळवला, असेही त्यांनी नमूद केले.
प्रमुख पाहुणे माजी नगरसेवक दीपक गावडे यांनी बॅ. नाथ पै यांच्या कार्याचा आढावा घेताना, सेवांगणच्या उपक्रमात आपल्या वडिलांचा सक्रिय सहभाग होता व त्यांना आदर्श समाजसेवक पुरस्कार मिळाल्याचा अभिमान व्यक्त केला. साने गुरुजींची “खरा तो एकची धर्म” ही प्रार्थना आपल्या आचरणात आणण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. अल्पायुष्यात बॅ. नाथ पै यांनी केलेले कार्य अतुलनीय असून त्यांचे विचार जिवंत ठेवण्याचे काम बॅ. नाथ पै सेवांगण सातत्याने करीत असल्याबद्दल त्यांनी कौतुक केले व सेवांगणला आपले कायम सहकार्य राहील, अशी ग्वाही दिली.
किशोर शिरोडकर यांनी बॅ. नाथ पै यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना, त्यांच्या जाण्याला ५५ वर्षे झाली तरी त्यांच्या स्मृती आजही मनात ताज्या असल्याचे भावनिक उद्गार काढले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रीया जांभवडेकर यांनी केले.
कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक भेटवस्तू व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
या कार्यक्रमास एलन डान्टस, दीपक गावडे, किशोर शिरोडकर, बापू तळावडेकर, अर्चना धुत्रे, डगरे मॅडम, अर्जुन पेंडूरकर, वीणा म्हाडगुत, खरात सर, मेस्त्री सर, श्रीधर गोंधळी, शोभा म्हाडगुत, जगदिश नलावडे, दीपक भोगटे, मनोज काळसेकर, रीया जांभवडेकर, मंगल पराडकर, दिक्षा आमरे यांच्यासह विद्यार्थी, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.






