मालवण | प्रतिनिधी :
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी “लढणाऱ्यांना यश मिळते” ही शिकवण प्रत्येक शिवसैनिकाला दिली आहे. त्याच शिकवणीनुसार उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यातील सहा जिल्हा परिषद व बारा पंचायत समिती मतदारसंघात ठाकरे शिवसेना निवडणूक लढवत आहे. या निवडणुकीत यश मिळवण्यासाठी प्रत्येक शिवसैनिक मैदानात उतरला असून ही लढाई या भागाच्या सर्वांगीण विकासासाठी आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत ठाकरे शिवसेनेला निश्चितच यश मिळेल, असा ठाम विश्वास ठाकरे शिवसेना मालवण तालुकाप्रमुख श्री. हरी खोबरेकर यांनी व्यक्त केला.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी श्री. हरी खोबरेकर यांनी मालवण तहसील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, मंदार ओरसकर, महेंद्र म्हाडगुत, नंदू गवंडी, भगवान लुडबे, मनोज मोंडकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याच दरम्यान माजी आमदार वैभव नाईक यांनीही उपस्थिती दर्शवत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
पत्रकारांशी बोलताना श्री. खोबरेकर म्हणाले की, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे उमेदवार जनशक्तीच्या जोरावर जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक लढवत आहेत. माजी आमदार वैभव नाईक, माजी खासदार विनायक राऊत आणि शिवसेना संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे शिवसेना निवडणूक रिंगणात उतरली आहे. या निवडणुकीत उतरलेले सर्व उमेदवार हे सर्वसामान्य जनतेतील असून ते जनतेचे प्रश्न प्रभावीपणे सोडवतील आणि निश्चितपणे पंचायत समिती व जिल्हा परिषदेत निवडून जातील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

गेल्या पाच वर्षांत जिल्हा परिषद बळकट करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केलेले प्रयत्न जनतेसमोर मांडले जाणार असल्याचे सांगत श्री. खोबरेकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सत्ताधाऱ्यांच्या काळात झालेल्या भ्रष्टाचारावरही तीव्र टीका केली. वॉटर प्युरीफायर असो वा आरोग्य यंत्रणा, गेल्या तीन वर्षांत जिल्हा परिषद आर्थिकदृष्ट्या खिळखिळी करण्याचे काम सत्ताधाऱ्यांनी केल्याचा आरोप त्यांनी केला. या भ्रष्टाचाराची भांडाफोड गावागावात केली जाईल आणि या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा झेंडा पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर फडकेल, असा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केला.







