मालवण दि. प्रतिनिधी :
सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) हे सर्व घटक महायुती म्हणून निवडणूक लढवीत आहेत. या महायुतीत बंडखोरी होण्याची शक्यता नसून, एखाद्या वेळेस बंडखोरी झालीच तर ती थांबविण्याची ताकद महायुतीच्या नेत्यांकडे आहे. त्यामुळे बंडखोरी होणार नाही, असा ठाम विश्वास शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला. तसेच या निवडणुकीत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि जिल्हा परिषदांवर महायुतीचाच झेंडा फडकेल आणि महाराष्ट्रात नवा इतिहास घडवू, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
मालवण तालुक्यात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी श्री. सामंत यांनी मालवण तहसील कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या महायुतीच्या उमेदवारांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी नगरसेवक उमेश नेरुरकर, शिवसेना युवा नेते संग्राम साळसकर, राजा गावकर, शेखर गाड, राजन माणगावकर, राजू बिडये तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलताना दत्ता सामंत म्हणाले की, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुका भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) या महायुतीच्या माध्यमातून लढविल्या जात आहेत. या निवडणुका राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, संपर्क मंत्री उदय सामंत, सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे आणि आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली लढविल्या जात आहेत.
महायुती या निवडणुकीत जास्तीत जास्त जागा जिंकेल आणि जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या व जिल्हा परिषदांवर महायुतीचाच झेंडा फडकेल. आज उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. प्रत्येक कार्यकर्त्याला उमेदवारी मिळावी असे वाटणे स्वाभाविक आहे; मात्र पक्षनिष्ठा आणि नेत्यांवरील श्रद्धा असलेले कार्यकर्ते पक्षनेतृत्वाने सांगितल्यास आपले उमेदवारी अर्ज मागे घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.







