मालवण | प्रतिनिधी
जय गणेश मंदिर, मेढा यांच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय आरती स्पर्धा २०२६ मध्ये अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण या शाळेने पाचवी ते सातवी (हायस्कूल विद्यार्थी) गटात प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल शाळेचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
स्पर्धेत टोपीवाला हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध, भक्तिरसपूर्ण आणि सुमधुर आरतीने परीक्षकांचे तसेच उपस्थित श्रोत्यांचे लक्ष वेधून घेतले. विजेत्या संघास ३,००० रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
या आरती समूहगानात गौरी राजन वस्त, ओजस्वी कैलास साळुंके, दुर्वा महेंद्र पराडकर, आर्या संदीप फोंडेकर, समर्थ सचिन बांदकर, क्षितिज मनोज दूधवडकर, प्रज्ञेश गणपत मिठबावकर आणि अनुज अर्जुन चव्हाण (पखवाज) या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
या यशामागे अनुभवी कलाकार व मार्गदर्शकांचे योगदान लाभले. आरती रचना सुप्रसिद्ध कवी श्री. वसंत वळंजू यांनी केली असून संगीत दिग्दर्शन श्री. सुधीर गोसावी सर यांनी केले. हार्मोनियम साथ श्री. अक्षय सातार्डेकर, तबला साथ श्री. सुधीर गोसावी तर तालरक्षण श्री. महेश धामापुरकर सर यांनी केले.
विद्यार्थ्यांच्या मेहनतीला योग्य मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने हे यश मिळाल्याचे शाळा प्रशासनाने नमूद केले. मुख्याध्यापक व व्यवस्थापन समितीने विजेत्या विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शकांचे अभिनंदन केले असून मालवणच्या सांस्कृतिक क्षेत्रात या यशाचे विशेष स्वागत होत आहे






