“आमचा राम राम, तुम्हाला सलाम”
“आम्हाला किमत नाही ना, ठिक आहे.. आता फक्त किमत मोजायला तयार रहा”
“कसंय ना शेठ, आता तुम्हाला दाखवांवच लागेल आमची ताकद “
राजधानी मुंबईत राजकीय घडामोडी ‘हॉटेल पॉलिटिक्स’च्या चौकटीत फिरत असतानाच, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र राजकारणाचा नवा चेहरा समोर येत आहे. जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येथे ‘व्हॉट्सॲप स्टेटस पॉलिटिक्स’ जोर धरू लागले असून, नाव न घेता ठेवले जाणारे सूचक संदेश, राजकीय वर्तुळात खळबळ उडवत आहेत.
सध्या जिल्ह्यात उमेदवारी आणि जागावाटपाचे गणित अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले जात आहे. अशा वेळी अचानक सोशल मीडियावर उमटणारे भावनिक, उपरोधिक आणि थेट संदेश देणारे स्टेटस हे केवळ वैयक्तिक अभिव्यक्ती न राहता, राजकीय संकेत मानले जात आहेत. ‘सर्व काही वरून ठरते, जमिनीवरील कार्यकर्त्यांना विचारले जात नाही’, ‘निष्ठेपेक्षा गणित महत्त्वाचे ठरते’ अशा आशयाचे स्टेटस जिल्हाभर चर्चेचा विषय ठरत आहेत.
विशेष म्हणजे, हे संदेश कोणत्याही नेत्याचे नाव न घेता टाकले जात असले, तरी त्यामागील रोख स्पष्ट असल्याची चर्चा आहे. अनेक वर्षे पक्षासाठी झटलेल्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोषाची भावना वाढत असल्याचे हे स्टेटस सूचित करत असल्याचे बोलले जात आहे. आधी काही भागांतून झालेल्या राजीनाम्यांनंतर आता सोशल मीडियावरून व्यक्त होणारी ही नाराजी, अंतर्गत धुसफुशीचे संकेत देत आहे.
राजकीय जाणकारांच्या मते, मुंबईतील बैठका, बंद दाराआड चर्चा आणि हॉटेलांमधील रणनीती यांच्या विरुद्ध सिंधुदुर्गात थेट मोबाईल स्क्रीनवरून प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे ‘हॉटेल पॉलिटिक्स’ आणि ‘स्टेटस पॉलिटिक्स’ अशी तुलना केली जात आहे. हे स्टेटस काही मिनिटांतच शेकडो मोबाईलवर पोहोचत असल्याने, त्याचा परिणामही तितकाच वेगाने जाणवत आहे.
दरम्यान, या घडामोडींवर अधिकृतपणे कुणीही बोलण्यास तयार नसले, तरी जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापत चालल्याचे स्पष्ट दिसत आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ही ‘व्हॉट्सॲप स्टेटस पॉलिटिक्स’ आणखी तीव्र होणार की शांत होणार, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मात्र सध्या तरी, नाव न घेता टाकलेले हे काही ओळींचे संदेश सिंधुदुर्गच्या राजकारणात मोठी खळबळ उडवत आहेत, हे मात्र नक्की.





