मालवण (प्रतिनिधी) :
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी भाजप–शिवसेना युतीचे जागावाटप जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्षात नाराजीचे सूर तीव्र होत असल्याचे चित्र आहे. त्याच पार्श्वभूमीवर मालवण तालुक्यातील पेंडूर जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे तब्बल २६ पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.
हे राजीनामे जिल्हा परिषद प्रभारी सतीश वाईरकर यांच्या माध्यमातून भाजपचे तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. दोन दिवसांपूर्वी ओरोस मंडलमधील भाजपच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर आता पेंडूर मतदारसंघातील घडामोडींमुळे पक्षातील असंतोष अधिकच वाढल्याचे संकेत मिळत आहेत.
राजीनामा देणाऱ्यांमध्ये भाजपचे जिल्हा परिषद पेंडूर प्रभारी सतीश अंकुश वाईरकर, तालुका उपाध्यक्ष जगदीश सु. चव्हाण, तालुका सरचिटणीस मिलिंद मारुती चव्हाण, पेंडूर पंचायत समिती प्रभारी चंद्रशेखर आत्माराम फोडेकर, शक्तिकेंद्र प्रमुख संदीप बाळकृष्ण सरमळकर, लक्ष्मण धोंडी माडये, महेश दिगंबर वाईरकर, सिताराम अर्जुन मिठबावकर, बूथ अध्यक्ष सत्यवान बाळकृष्ण पाटील, गणेश रमेश वाईरकर, रमेश संभाजी न्हिवतकर, रमेश विजय मासये, केशव सहदेव मुसळे, कमलाकर मधुकर आजगावकर, संदीप विनोद पावसकर, महादेव राजाराम दळवी, राजेंद्र रमाकांत दळवी, रमेश सहदेव बांदिवडेकर, बाळकृष्ण चिंतामणी प्रभू, संतोष वसंत देऊलकर, गिरीश साबजी दळवी, स्वप्निल श्रीहरी नाईक, दर्शन महेश परब, वराड अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष अर्जुन वसंत तळगावकर, तळगाव पंचायत समिती प्रभारी संदेश अरुण चव्हाण तसेच सोशल मीडिया प्रमुख सुमित अरुण सावंत यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दिलेल्या या राजीनाम्यांमुळे पेंडूर मतदारसंघासह संपूर्ण मालवण तालुक्यात भाजपसमोरील संघटनात्मक आव्हाने अधिक गंभीर बनली असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.






