मुंबई | प्रतिनिधी —
मुंबई महानगरपालिकेत काठावरचे बहुमत मिळविलेल्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीला पुढील पाच वर्षे पालिकेचा कारभार करताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे. महत्त्वाच्या समित्यांमध्येही या युतीला जेमतेम बहुमत मिळणार असल्याने विरोधकांना सोबत घेतच निर्णय घ्यावे लागण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.
महापालिकेत महायुतीतर्फे महापौर कोण होणार, याबाबत अद्याप स्पष्टता नसली तरी महत्त्वाच्या समित्यांमधील पक्षनिहाय प्रतिनिधित्वाचा आकडा निश्चित झाला आहे. त्यानुसार वजनदार मानल्या जाणाऱ्या स्थायी समितीत भाजपचे १०, शिवसेना (उबाठा) ८, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ३, तर मनसे आणि एमआयएमचा प्रत्येकी १ नगरसेवक असेल.
नगरविकास विभागाने ठरवून दिलेल्या नियमानुसार, निवडून आलेल्या नगरसेवकांच्या संख्येनुसार स्वीकृत नगरसेवकांची संख्या तसेच विविध समित्यांमधील प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेतील २२७ नगरसेवकांच्या बळावर एकूण १० स्वीकृत नगरसेवक नेमता येणार आहेत.
स्वीकृत नगरसेवकांचे गणित
भाजपचे ८९ नगरसेवक निवडून आल्याने ३.९२ टक्क्यांनुसार पक्षाला ४ स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे २९ नगरसेवक असल्याने त्यांना १.२८ टक्क्यांनुसार केवळ १ स्वीकृत नगरसेवक मिळेल. शिवसेना (उबाठा) पक्षाचे ६५ नगरसेवक निवडून आल्याने त्यांना २.८६ टक्क्यांनुसार ३ स्वीकृत नगरसेवक मिळणार असून काँग्रेसला १ स्वीकृत नगरसेवक मिळेल. यामुळे उबाठा शिवसेनेला शिंदे गटाच्या तिप्पट स्वीकृत नगरसेवक मिळणार आहेत. मनसे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि समाजवादी पक्षाला संख्याबळ अपुरे असल्याने स्वीकृत नगरसेवकपद मिळणार नाही. मात्र एमआयएमचे ८ नगरसेवक निवडून आल्याने त्यांना १ स्वीकृत नगरसेवक नेमता येणार आहे.
समित्यांमधील पक्षनिहाय प्रतिनिधित्व
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला स्थायी समितीत ३, सुधार समितीत ३, शिक्षण समितीत ३, बेस्ट समितीत २ आणि वृक्ष प्राधिकरण समितीत २ नगरसेवकांचे प्रतिनिधित्व मिळणार आहे. याशिवाय विशेष समित्यांमध्ये पक्षाचे ५ नगरसेवक असतील.
काँग्रेसचे २४ नगरसेवक निवडून आले असून, संख्याबळानुसार काँग्रेसला स्थायी समितीत ३, सुधार समितीत ३, शिक्षण समितीत ३, बेस्ट समितीत २ आणि वृक्ष प्राधिकरण समितीत १ नगरसेवक मिळेल. विशेष समित्यांमध्ये काँग्रेसचे ४ नगरसेवक असतील.
एमआयएमचे ८ नगरसेवक असून, त्यांना स्थायी, सुधार, शिक्षण, बेस्ट आणि वृक्ष प्राधिकरण या प्रत्येक समितीत प्रत्येकी १ नगरसेवकाचे प्रतिनिधित्व मिळणार आहे. विशेष समित्यांमध्येही पक्षाचा १ नगरसेवक असेल.
मनसेचे ६ नगरसेवक निवडून आले असून, स्वीकृत नगरसेवकपद मिळणार नसले तरी स्थायी, सुधार आणि शिक्षण समितीत प्रत्येकी १ नगरसेवकाला स्थान मिळेल. बेस्ट आणि वृक्ष प्राधिकरण समितीत मनसेला प्रतिनिधित्व मिळणार नसले, तरी विशेष समित्यांमध्ये पक्षाचा १ नगरसेवक असेल.
काठावरच्या बहुमतामुळे महापालिकेतील सत्ताधारी युतीला प्रत्येक निर्णयात राजकीय समतोल साधावा लागणार असून, विरोधकांची भूमिका आगामी काळात अधिक निर्णायक ठरण्याची शक्यता आहे





