जिल्ह्यात सध्या जोरदारपणे सुरू असलेला अवैध वाळू उपसा आणि वाहतूक ही प्रशासनाच्या आशीर्वादानेच चालू असल्याचा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सागर जाधव यांनी केला आहे. याबाबत आम्ही वारंवार आवाज उठवला असतानाही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक लोकप्रतिनिधींचा या अवैध वाळू व्यवसायाला उघडपणे किंवा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्यामुळे वाळू व्यावसायिकांची मुजोरी वाढली आहे. त्यामुळेच प्रशासन कारवाई करत नसल्याचा आरोप सागर जाधव यांनी केला. केवळ दिखाव्यापुरती कारवाई करून पुन्हा डोळेझाक करण्याचे महसूल विभागाचे नाटक आता बंद झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली.
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरमुळे अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. वाळू उपशाविरोधात स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने केली, मात्र महसूल विभागाने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला. वाळू व्यावसायिकांकडून मलिदा खाण्याची सवय लागल्यामुळेच महसूल प्रशासन कारवाईबाबत उदासीन असल्याचे चित्र दिसत असल्याचे जाधव म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून अवैध वाळू उपसा आणि वाहतूक महसूल विभागाच्या आशीर्वादाने सुरू आहे. त्यामुळे शासनाच्या महसुलात अपेक्षित वाढ झाली नसली तरी संबंधित कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक ‘महसुलात’ मात्र वाढ झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचा आरोप मनसेने केला आहे.
या गंभीर प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः लक्ष घालून वेळीच कठोर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात येणार असल्याचे सागर जाधव यांनी सांगितले. लवकरच मनसेचे जिल्हा शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन योग्य ती कार्यवाही करण्याबाबत निवेदन देणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.





