मालवण : (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील वायरी समुद्रकिनाऱ्यावर सापडलेला पंजाब येथील पर्यटकांचा मोबाईल संबंधित पर्यटकांचा शोध घेऊन त्यांना परत करण्यात आला. मालवणमधील पर्यटन व्यावसायिकांनी दाखविलेल्या माणुसकी व प्रामाणिकपणाबद्दल पर्यटकांनी समाधान व्यक्त करत आभार मानले.
रविवारी सकाळी वायरी बीचवर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या पंजाबमधील पर्यटकांचा एक मौल्यवान मोबाईल हरवला होता. मोबाईल हरवल्याचे लक्षात येताच पर्यटकांकडून सर्वत्र शोधाशोध सुरू होती.
दरम्यान, मालवण येथील सेवानिवृत्त नायब तहसीलदार तसेच वायरी गर्दे रोड येथील रहिवासी उदय गोसावी हे सकाळच्या वेळेस समुद्रकिनारी मॉर्निंग वॉकसाठी गेले असता, दादा वेंगुर्लेकर यांच्या वाटेवरील बसण्याच्या कट्ट्याजवळ त्यांना किनाऱ्यावर पडलेला मोबाईल आढळून आला. त्यांनी तो मोबाईल त्वरित पर्यटन व्यावसायिक दादा वेंगुर्लेकर यांच्याकडे सुपूर्द केला.
मोबाईलचा मालक शोधण्यासाठी विविध ठिकाणी संदेश देण्यात आले. त्यानंतर पंजाबहून आलेल्या पर्यटक महिला सौ. मनिषा लेंका यांनी आपल्या मोबाईलवरून मालवण येथून कॉल केला. त्यावेळी वेंगुर्लेकर यांनी मोबाईल आपल्याकडे सुरक्षित असल्याची माहिती दिली. काही वेळातच संबंधित महिला पर्यटक आपल्या सहकाऱ्यांसह वायरी बीचवर आल्या, त्यांना मोबाईल परत देण्यात आला.
हा मोबाईल परत मिळाल्याने पर्यटकांनी समाधान व्यक्त करत मालवणच्या पर्यटन व्यावसायिकांच्या प्रामाणिकपणा व माणुसकीचे मनापासून कौतुक केले.






