मालवण : (प्रतिनिधी)
मालवण तालुक्यातील मेढा येथे ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर यांनी उभारलेले व पर्यटकांचे विशेष आकर्षण ठरलेले जय गणेश मंदिर याचा २१ वा वर्धापन दिन सोहळा दि. १९ ते २३ जानेवारी या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. या पाच दिवसांच्या कालावधीत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांसह स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सोमवार, दि. १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ ते ५.३० या वेळेत नांदी व सुश्राव्य गायन होणार असून, सायंकाळी ६ ते ७.३० या वेळेत गणेश आरती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मालवण तालुक्यातील शाळांसाठी असून, पहिला गट इयत्ता ५ वी ते ७ वी आणि दुसरा गट ८ वी ते १० वी असा असणार आहे.
मंगळवार, दि. २० जानेवारी रोजी सायंकाळी ६ ते रात्री ९ या वेळेत गणेश आरती स्पर्धेतील खुल्या गटाची स्पर्धा होणार आहे. त्यानंतर रात्री ९ वाजता श्री देवी भुमिका दशावतार कोकणनाट्य मंडळ, मळगाव यांचा दशावतारी नाट्यप्रयोग सादर केला जाणार आहे.
बुधवार, दि. २१ जानेवारी रोजी सायंकाळी मालवण शहर मर्यादित महिलांसाठी उकडीचे मोदक स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. रात्री ८ ते १० या वेळेत खुली अभंग गायन स्पर्धा होणार आहे.
गुरुवार, दि. २२ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री गणेशजन्माचे कीर्तन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर जोशी घानोरकर (पुणे) यांच्या वतीने सादर होणार आहे. यावेळी ऑर्गन – भालचंद्र केळुसकर, तबला – पंकज पाटील, पखवाज – विशाल केळुसकर साथसंगत करणार आहेत. दुपारी १२.३० ते ३ या वेळेत महाप्रसाद होईल. रात्री ९ वाजता काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे.
शुक्रवार, दि. २३ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता भालचंद्र सोहम (कुडाळ) यांचे भजन, तर रात्री ८.३० वाजता श्री भुतनाथ प्रासादिक भजन मंडळ वायरी – भुतनाथ बुवा भालचंद्र केळुसकर यांचे भजन होणार आहे.
या वर्धापन दिन सोहळ्यात भाविकांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





