कुडाळ-
शाळा वाचवा – शिक्षण वाचवा मंच, सिंधुदुर्ग यांच्या वतीने सोमवार दि. २६ जानेवारी २०२६ रोजी नियोजित करण्यात आलेले लाक्षणिक उपोषण स्थगित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
मंचाने यापूर्वी २६ जानेवारी रोजी लाक्षणिक उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान जिल्ह्याचे पालकमंत्री ना. नितेश राणे स्वतः उपस्थित राहिले होते. यावेळी त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्या व भूमिका सविस्तरपणे ऐकून घेतल्या. तसेच या विषयावर मुख्यमंत्री व शालेय शिक्षण मंत्री यांच्याशी सकारात्मक चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन दिले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणतीही शाळा बंद होऊ नये, यासाठी आपण स्वतः प्रत्यक्ष प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले होते. त्यांच्या या सकारात्मक भूमिकेचा आणि दिलेल्या आश्वासनाचा मान राखून शाळा वाचवा – शिक्षण वाचवा मंचने २६ जानेवारी रोजीचे नियोजित लाक्षणिक उपोषण स्थगित करण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले आहे.
हा निर्णय मंचाचे अध्यक्ष संजय वेतुरेकर व सचिव महेश पाटोळे यांनी संयुक्तपणे जाहीर केला आहे. पुढील घडामोडींवर मंचाचे बारकाईने लक्ष राहील आणि गरज भासल्यास पुढील आंदोलनात्मक भूमिका निश्चित करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.







