देवबाग (प्रतिनिधी)
देवबाग येथील न्यू इंग्लिश स्कूल (स्थापना १९७३) तथा सध्याच्या डॉ. दत्ता सामंत इंग्लिश स्कूल देवबागच्या १९९२ सालच्या दहावी बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा शाळेच्या आवारात विविध कार्यक्रमांनी उत्साहात संपन्न झाला. तब्बल ३५ वर्षांनंतर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थ्यांनी या निमित्ताने शालेय आठवणींना उजाळा दिला.
स्नेहमेळाव्याच्या दिवशी माजी विद्यार्थी पूर्वीप्रमाणेच सकाळी शाळेतील आजी विद्यार्थ्यांसोबत प्रार्थनेला उपस्थित राहिले. त्यानंतर शिस्तबद्ध रांगेत चालत प्रशालेच्या सभागृहात प्रवेश करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. स्नेहमेळाव्याचे उद्घाटन सेवानिवृत्त शिक्षक सौ. मसदेकर, श्री. मसदेकर, श्री. पाटील व श्री. महादेव गोसावी यांच्या हस्ते सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर प्रशालेच्या विद्यमान मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर उपस्थित होत्या.
या प्रसंगी सर्व माजी शिक्षक व कर्मचारी यांचा माजी विद्यार्थ्यांच्या वतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. शिवाजी केळूसकर, संजय केळूसकर, चित्रांगी येरागी, राजन कुमठेकर, श्रीमती तारी व आयोलीन लुद्रिक यांनी आपल्या मनोगतातून शालेय जीवनातील आठवणी सांगितल्या. माजी शिक्षकांनीही भावना व्यक्त करत सर्वांनी आयुष्याच्या या टप्प्यावरही एकमेकांशी संपर्कात राहावे, असे आवाहन केले.
मुख्याध्यापिका सौ. खोबरेकर यांनी माजी विद्यार्थ्यांनी अशा प्रकारचे स्नेहमेळावे आयोजित करून शाळेशी नाते जपावे, यासाठी शाळा प्रशासन नेहमी सहकार्य करेल, असे सांगितले.
यानंतर माजी विद्यार्थ्यांकडून शाळेतील सर्व विद्यार्थ्यांसाठी भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. पुढे माजी विद्यार्थ्यांनी जुने पारंपरिक व बैठे खेळ खेळत जुन्या आठवणी ताज्या केल्या. या बॅचतर्फे प्रशालेसाठी लवकरच वस्तुरूप मदत देण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय केळूसकर यांनी केले, तर आभार राजन कुमठेकर यांनी मानले. कार्यक्रमानंतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी माजी शिक्षिका सौ. सावजी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.
या स्नेहमेळाव्यात राजन कुमठेकर, संजय केळूसकर, रमेश मांजरेकर, भगवान चिंदरकर, सुनील धुरी, अजित जुवाटकर, शिवाजी केळूसकर, लीलाधर केळूसकर, चंद्रशेखर राऊळ, पद्माकर मालंडकर, दिनेश मयेकर, आयोलीन लुद्रिक, लवू कुबल, सुचिता तारी, चित्रांगी येरागी, सुनंदा कोळंबकर, विजया सारंग, भारती मोंडकर, मिलन मोर्वेकर, करुणा खराडे, गीता साळगावकर, सीमा भोवर, कार्मेलीन लुद्रिक आदी माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.







