सिंधुदुर्ग : (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात रुग्णांची गंभीर हेळसांड झाल्याचा प्रकार समोर आला असून, यावरून शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. पोटात ट्युमर असलेल्या एका महिला रुग्णाला चुकीचा अहवाल देत ‘हाय रिस्क गर्भवती’ असल्याचे नमूद करून गोवा-बांबुळी येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच कर्करोग असलेल्या दुसऱ्या रुग्णाला तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्याचे कारण देत थेट छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आल्याने रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठी गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर माजी आमदार वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. अनंत दवंगे यांची भेट घेऊन संबंधित प्रकरणाबाबत जाब विचारला. यावेळी कसाल जिल्हा परिषद विभागप्रमुख रवीबुवा कदम उपस्थित होते.
यावेळी बोलताना वैभव नाईक म्हणाले की, “सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना जिल्ह्यातच दर्जेदार वैद्यकीय उपचार मिळावेत, या उद्देशाने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजूर करून सुरू करण्यात आले. मात्र, डीन म्हणून आपण येथे अपेक्षित कार्यक्षमता दाखवण्यात अपयशी ठरत आहात. सत्ताधारी खासदार व आमदारही या गंभीर प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहेत.”
महिला रुग्णाची सोनोग्राफी झाली होती का, असा थेट सवाल नाईक यांनी डीन यांना केला असता, सोनोग्राफी तज्ज्ञ उपलब्ध नसल्याचे उत्तर देण्यात आले. यावर नाईक यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत, “मग चुकीचा अहवाल देणाऱ्या डॉक्टरवर काय कारवाई करण्यात आली? सुमारे एक हजार कोटी रुपयांचे अत्याधुनिक रुग्णालय उभे राहत असताना येथील रुग्णांना बाहेर रेफर केले जात आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. हे रुग्णालय उपचारासाठी आहे की रुग्णांना बाहेर पाठवण्यासाठी?” असा सवाल उपस्थित केला.
रुग्णांना वेळेवर आणि योग्य उपचार मिळण्यासाठी रुग्णालयाच्या कामकाजात तातडीने सुधारणा करण्यात याव्यात, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही माजी आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिला.







