- खासदार नारायण राणेंनी पत्रकार परिषदेत महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला केला जाहीर
- घोषणेनंतर काही तासांतच भाजप ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांचा राजीनामा
- “सध्याच्या राजकीय परिस्थितीत पदावर राहणे उचित नाही” – राजीनाम्यात स्पष्ट उल्लेख
- ओरोस मंडळातील ४३ पदाधिकाऱ्यांचे एकाचवेळी राजीनामे, भाजपमध्ये असंतोष उफाळला
- जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले
सिंधुदुर्ग : (प्रतिनिधी)
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर होताच माजी केंद्रीय मंत्री व खासदार नारायण राणे यांनी महायुतीची अधिकृत घोषणा केली. त्यानंतर अवघ्या काही तासांतच राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप, शिंदे गटाची शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यातील महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर केला. मात्र या घोषणेनंतर काही तासांतच भारतीय जनता पार्टीत नाराजीचे सूर उमटत असून, जिल्ह्यात राजीनाम्यांचे नाट्य सुरू झाले आहे.
महायुतीचा फॉर्म्युला जाहीर झाल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे ओरोस मंडळ अध्यक्ष आनंद उर्फ भाई सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या राजीनाम्यात त्यांनी, “मी ओरोस मंडळ अध्यक्ष पदाचा राजीनामा देत आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत या पदावर राहून काम करणे मला उचित वाटत नाही. कोणत्याही नेत्यावर माझी नाराजी नाही, तरी माझा राजीनामा तात्काळ स्वीकारण्यात यावा,” असे नमूद केले आहे. हा राजीनामा त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्याकडे सादर केल्याची माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
आनंद उर्फ भाई सावंत यांच्या राजीनाम्यानंतर ओरोस मंडळातील असंतोष अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. ओबीसी जिल्हाध्यक्ष महेश उर्फ छोटू पारकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य लॉरेन्स मान्येकर, उदयकुमार जांभवडेकर, ओरोस मंडळ उपाध्यक्ष आबा मुंज, जिल्हा युवा मोर्चा उपाध्यक्ष जयेश चिंचळकर, अनुसूचित जाती मोर्चा मंडळ अध्यक्ष सुनील जाधव यांच्यासह बूथ अध्यक्ष, शक्तिकेंद्र प्रमुख असे मिळून एकूण ४३ पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचे राजीनामे दिल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यात महायुती एकत्रितपणे निवडणुका लढवणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर करून महायुतीने शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला असतानाच भाजपमधील अंतर्गत नाराजी उघडपणे समोर येऊ लागली आहे.
महायुतीची अधिकृत घोषणा आणि त्यानंतर तात्काळ सुरू झालेली राजीनाम्यांची मालिका पाहता, आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.







