▪️ मालवण नगरपरिषद प्रशासनाची रविवारी सकाळी अचानक धडक कारवाई
▪️ मच्छिमार्केट मासे लिलाव परिसरात होलसेल प्लास्टिक विक्रीचा पर्दाफाश
▪️ कट्टा येथून आणलेला प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त
▪️ संबंधितांवर ५ हजार रुपयांचा दंड; पुन्हा आढळल्यास कठोर कारवाईचा इशारा
▪️ उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी स्वच्छता विभागाच्या कारवाईचे केले कौतुक
मालवण : (प्रतिनिधी)
बंदी असलेल्या (सिंगल युज) प्लास्टिक पिशव्यांचा मोठा साठा मालवण नगरपरिषद प्रशासनाने जप्त केला आहे. रविवारी सकाळी मालवण मच्छिमार्केट मासे लिलाव परिसरात करण्यात आलेल्या कारवाईत रिक्षा टेम्पोसह सुमारे ५०० किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून त्या मालवण नगरपरिषद कार्यालयात जमा करण्यात आल्या असल्याची माहिती नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांनी दिली.
मालवण मच्छिमार्केट मासे लिलाव परिसरात बंदी असलेल्या (सिंगल युज) प्लास्टिक पिशव्या होलसेल स्वरूपात विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर नगरपालिकेचे स्वच्छता निरीक्षक संजय पवार, आरोग्य लिपिक मंदार केळूसकर व कर्मचारी सागर जाधव यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. तपासणीदरम्यान पांढऱ्या रंगाच्या रिक्षा टेम्पोमध्ये मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा साठा असल्याची खात्री झाली. हा साठा कट्टा येथून आणण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.
कारवाई पथकाने रिक्षा टेम्पो व प्लास्टिक पिशव्यांचा साठा ताब्यात घेऊन नगरपरिषदेत जमा केला आहे. संबंधितांवर ५ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात येणार असून, पुन्हा अशा प्रकारचा साठा आढळल्यास नियमानुसार अधिक कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा स्वच्छता निरीक्षक संजय पवार यांनी दिला.
बंदी असलेले प्लास्टिक हे पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक असून ते विघटनशील नसल्याने शेकडो वर्षे पर्यावरणात टिकून राहते. यामुळे प्रदूषण वाढते, ड्रेनेज यंत्रणेत अडथळे निर्माण होतात तसेच जनावरांच्या व मानवी आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. त्यामुळे नागरिकांनी बंदी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर टाळावा, असे आवाहन नगरपरिषद प्रशासनाकडून करण्यात आले आहे. बंदी असलेल्या प्लास्टिकविरोधातील कारवाई मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचेही सांगण्यात आले.
दरम्यान, उपनगराध्यक्ष दिपक पाटकर यांनी स्वच्छता विभागाच्या या कारवाईचे कौतुक केले. मालवण शहराच्या स्वच्छता, पर्यावरण संरक्षण व नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने नगरपरिषद प्रशासनाने उचललेल्या प्रत्येक योग्य पावलाला आपण पूर्ण सहकार्य करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.








