कलर्स मराठीवरील लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस मराठी ६’ सध्या घराघरात चर्चेचा विषय ठरत आहे. पहिल्याच आठवड्यात वाद, टास्क आणि भावनिक क्षणांनी शो रंगला असून रितेश भाऊची हटके स्टाईल आणि १७ स्पर्धकांचा आक्रमक खेळ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरतो आहे. काहीच तासांत यंदाच्या सीझनचा पहिला ‘भाऊचा धक्का’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या मंचावर सदस्यांची पोलखोल होणार आहे.
आजच्या ‘भाऊच्या धक्क्यावर’ सुपरस्टार रितेश देशमुख सदस्यांची कानउघडणी करताना दिसणार आहे. वादांचा हिशोब मांडतानाच काही सदस्यांचे कौतुकही रितेश करणार आहे. यामध्ये सर्वाधिक लक्ष वेधून घेतले ते प्रभु शेळके याच्या खेळाने. साधा, शांत आणि विनोदी स्वभाव असलेल्या प्रभुने आपल्या मनोरंजनाच्या शैलीने प्रेक्षकांसह रितेश भाऊचेही मन जिंकले आहे.
प्रभुच्या खेळावर भाष्य करताना रितेश देशमुख म्हणाला, “प्रभु, बाहेरच्या दुनियेत तू एक कॅमेराने कंटेंट बनवतोस; इथे १०० कॅमेरे आहेत. तू हसवलंस, तू रडवलंस. मी बाकी सगळ्यांना सांगू इच्छितो—तुम्ही याला छोटा समजत आहात, पण या आठवड्यातले हे खरे एंटरटेनमेंटचे डॉन आहेत!”
रितेश भाऊच्या या शब्दांनी प्रभु भावूक झाला आणि त्याने नम्रपणे सर्वांचे आभार मानले.
घरात इतर सदस्यांच्या तुलनेत प्रभु जरी शांत वाटत असला, तरी ‘डॉन’ या विशेषणामुळे आता घरात त्याची एक वेगळीच छाप निर्माण होणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, पहिल्याच आठवड्यात वादाच्या केंद्रस्थानी राहिलेली तन्वी कोलते हिच्या वागणुकीचाही आज आढावा घेतला जाणार आहे. मोठ्यांशी उद्धटपणा, मनासारखं न झाल्यास रडणं—या सगळ्यावर रितेश भाऊ काय भूमिका घेतो, कोणाची शाळा घेतो, हे पाहणं प्रेक्षकांसाठी उत्सुकतेचं ठरणार आहे.






