🛑 नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या हस्ते फीत कापून उद्घाटन
🛑 कणकवलीतील विद्यार्थ्यांचा इंटीरियर व फॅशन डिझाईनमधील सर्जनशील प्रवास – उपनगराध्यक्ष सुशांत नाईक
कणकवली : प्रतिनिधी
फ्लोरेट कॉलेज ऑफ डिझायनिंग, कणकवली यांच्या वतीने आयोजित ‘आरंभ प्रदर्शन–२०२६’ या वार्षिक प्रदर्शनाचा शुभारंभ कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या शुभहस्ते फीत कापून करण्यात आला. यावेळी उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, अनंत पिळणकर, कवी–लेखक–निवेदक निलेश पवार, फ्लोरेट कॉलेजच्या संचालिका आस्था कदम, कदम सर, आर्या बिडये यांच्यासह महाविद्यालयाचे विद्यार्थी व अनेक मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. फ्लोरेट कॉलेजच्या वतीने नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक तसेच उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाकृतींची पाहणी केली.
या प्रदर्शनात विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या लहान मुलांसाठी किड्स बेडरूम संकल्पना, निसर्गाच्या सान्निध्यातील कॅफे डिझाईन, हॅन्डमेड नेकलेस, तसेच विविध नाविन्यपूर्ण कलाकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. विद्यार्थ्यांच्या कल्पकतेतून साकारलेल्या या कलाकृतींना प्रेक्षकांकडून मोठी दाद मिळाली.
यावेळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी कणकवलीमध्ये अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाचे विशेष कौतुक केले. “विद्यार्थ्यांमध्ये नव्या कल्पना, सर्जनशीलता आणि व्यावसायिक दृष्टिकोन विकसित करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य फ्लोरेट कॉलेजच्या माध्यमातून होत आहे. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलाकृती अत्यंत कौतुकास्पद असून भविष्यात या कॉलेजमधून दर्जेदार डिझायनर्स घडावेत,” अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनीही ‘आरंभ प्रदर्शन–२०२६’ला शुभेच्छा दिल्या. “फ्लोरेट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अनोख्या कलाकृतींमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात इंटीरियर व फॅशन डिझाईन क्षेत्राबाबत विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होईल. आजच्या युवा पिढीसाठी इंटीरियर व फॅशन डिझाईन हे करिअरचे उत्तम पर्याय ठरत आहेत. कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या कलाकृतींचा अनुभव घ्यावा,” असे प्रतिपादन त्यांनी केले.








