- विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालवण प्रखंडाच्या वतीने स्पर्धेचे आयोजन
- प्रसिद्ध आंगणवाडी यात्रोत्सवात पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण
- सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण पिढीत धर्मविषयक जनजागृतीचा उद्देश
- रील स्पर्धेत आकर्षक रोख बक्षिसांसह विशेष पारितोषिके
- हिंदू समाज संघटन व धर्मसंरक्षणावर भर देण्याचे आवाहन
मालवण : प्रतिनिधी
हिंदू धर्मावर वाढत्या संकटांचा सामना करण्यासाठी तसेच तरुण पिढीमध्ये धर्माविषयी जागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने विश्व हिंदू परिषद व बजरंग दल मालवण प्रखंडाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रसिद्ध आंगणवाडी यात्रोत्सवाच्या दरम्यान पालकमंत्री नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार असल्याची माहिती विश्व हिंदू परिषद धर्मप्रसारक मालवण प्रमुख अमित सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हॉटेल अदिती येथे आयोजित पत्रकार परिषदेत विश्व हिंदू परिषद प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत, बजरंग दल मालवण प्रखंड संयोजक गणेश चव्हाण, जिल्हा बजरंग दल संयोजक कृष्णा धुळप्पनवार, जिल्हा सहसंयोजक श्रीराज बांदकर, अमित गावडे, अनिकेत फाटक, तेजस चव्हाण, प्रसाद रुळपंकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
अमित सामंत म्हणाले की, ग्रामीण भागात आजही गरीब व गरजू हिंदू कुटुंबांवर आर्थिक आमिष दाखवून धर्मांतरणाचे प्रकार घडत आहेत. हे रोखण्यासाठी आणि हिंदू धर्माच्या संरक्षणासाठी प्रभावी जनजागृती आवश्यक आहे. सध्याची तरुण पिढी सोशल मीडियावर सक्रिय असल्याने त्याचा सकारात्मक वापर करत धर्मविचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या रील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
धर्मरक्षण व हिंदू संस्कृती या विषयांवर आधारित रील स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ११,१११ रुपये, ७,७७७ रुपये आणि ५,५५५ रुपये अशी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार असून उत्कृष्ट अभिनेता, अभिनेत्री, बालकलाकार व उत्कृष्ट दिग्दर्शक यांनाही विशेष पारितोषिके दिली जाणार आहेत.
आंगणवाडी यात्रोत्सवाच्या काळात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने विशेष कार्यालय उभारण्यात येणार असून यात्रेत येणाऱ्या भाविकांना हिंदू धर्माशी संबंधित माहिती दिली जाणार आहे. महाराष्ट्रातील बदलत्या सामाजिक व राजकीय परिस्थितीत हिंदू अधिक बळकट करण्याची गरज असल्याचे मत प्रखंड अध्यक्ष भाऊ सामंत यांनी व्यक्त केले.
या मोहिमेला बळ देण्यासाठी कोकण विश्व हिंदू परिषद संघटक अनिरुद्ध भावे, बजरंग दलाचे श्री. ठाकूर यांच्यासह रत्नागिरी–सिंधुदुर्ग विभागातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून अधिकाधिक हिंदूंनी या धर्मकार्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.







