- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गातील राजकीय हालचालींना वेग
- कणकवलीत उद्या सकाळी ११ वाजता महायुतीची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद
- जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुकांसाठी जागावाटपाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
- खासदार नारायण राणे, मंत्री नितेश राणेंसह महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार
- कार्यकर्ते आणि विरोधकांचे लक्ष एकवटले; राजकीय वातावरण तापले
कणकवली | प्रतिनिधी
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला असून, उद्या सकाळी ११ वाजता कणकवली येथे महायुतीची महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी होणाऱ्या या परिषदेत महायुतीतील जागावाटपाबाबत अधिकृत घोषणा होण्याची दाट शक्यता असल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या परिषदेकडे लागले आहे.
या पत्रकार परिषदेला भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे तसेच माजी आमदार प्रमोद जठार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. याशिवाय भाजप जिल्हाध्यक्ष प्रमाकर सावंत, शिवसेना जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत आणि संजू परब यांच्यासह महायुतीचे प्रमुख पदाधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांसाठी महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार आणि नेतृत्व कोणाकडे राहणार, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. या चर्चांना उद्या पूर्णविराम मिळण्याची शक्यता असून, महायुतीच्या एकत्रित शक्तिप्रदर्शनामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
उद्या होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे कार्यकर्त्यांसह विरोधकांचेही लक्ष लागले असून, या पत्रकार परिषदेचा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या राजकारणावर मोठा प्रभाव पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.







