मालवण (प्रतिनिधी) :
ग्रामपंचायत सुकळवाड येथे SMART सोलर योजनेबाबत मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात मालवण वीज वितरण कंपनीचे उपविभागीय उपकार्यकारी अभियंता श्री. म्हेत्रे यांनी उपस्थित ग्रामस्थांना SMART सोलर योजनेची उद्दिष्टे, लाभ व अंमलबजावणी प्रक्रियेची सविस्तर माहिती दिली. यावेळी श्री. कांबळे यांनीही योजनेविषयी मार्गदर्शन करत नागरिकांच्या शंकांचे निरसन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून उपसरपंच श्री. किशोर पेडणेकर यांनी सौरऊर्जेचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले. सौरऊर्जा ही पर्यावरणपूरक, दीर्घकालीन व आर्थिकदृष्ट्या लाभदायक असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी ग्रामसेवक उपस्थित होते.
याच कार्यक्रमात दाभोलकर सोलर अँड ऍग्रोटेक इंडस्ट्रीज प्रा. लि.चे श्री. किशोर दाभोलकर यांनी रूफटॉप सोलर प्रकल्प, सोलर प्रणाली बसवण्याची प्रक्रिया, नेट मीटरिंग व्यवस्था तसेच देखभाल व दुरुस्तीबाबत तांत्रिक माहिती दिली.
या मार्गदर्शनपर कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना तज्ज्ञांकडून समर्पक उत्तरे देण्यात आल्याने कार्यक्रमास ग्रामस्थांचा चांगला प्रतिसाद लाभला.






