मालवण (प्रतिनिधी):
गेल्या २२ वर्षांपासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ राहून प्रतिकूल परिस्थितीत संघटना वाढवणारे भाजपचे मालवण मंडल अध्यक्ष बाबा मोंडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या पदाचा तसेच पक्षाच्या सक्रिय सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याची घोषणा केली. मालवण नगरपालिका निवडणुकीत जिल्हा नेतृत्वाने चुकीची धोरणे राबवून स्वतंत्र समांतर यंत्रणा उभी केल्यामुळेच भाजपचा पराभव झाला, असा गंभीर आरोप त्यांनी यावेळी केला.
मालवण येथील हॉटेल महाराज येथे आयोजित पत्रकार परिषदेत बाबा मोंडकर यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीचा आढावा घेत पक्षाच्या निर्णयप्रक्रियेवर नाराजी व्यक्त केली. भाजपचे नेते विनोद तावडे यांच्या मार्गदर्शनाखाली युवकावस्थेत पक्षात प्रवेश केल्याचे सांगत, गेली २२ वर्षे पक्षाने दिलेली प्रत्येक जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडल्याचे त्यांनी नमूद केले.
लोकसभा निवडणुकीत खासदार नारायण राणे आणि विधानसभा निवडणुकीत महायुतीचे आमदार निलेश राणे यांच्या विजयासाठी कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली. मालवण शहर व देवबाग जिल्हा परिषद गटातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्यात आले. या यशानंतर मालवण शहरात भाजप मजबूत स्थितीत असून पक्षाकडे १३ पेक्षा जास्त नगरसेवक होते, असे मोंडकर यांनी सांगितले.
लोकसभा व विधानसभा निवडणुकीत योगदान दिलेल्या भाजप कार्यकर्त्यांना नगरपालिका निवडणुकीत न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात जिल्हा नेतृत्वाकडून कार्यकर्त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम झाले, असा आरोप त्यांनी केला. निष्ठावान भाजप कार्यकर्ते तसेच नारायण राणे यांचे समर्थक यांना डावलून, तिसऱ्याच समांतर यंत्रणेच्या कार्यकर्त्यांना तिकीट वाटपात झुकते माप देण्यात आले, असे ते म्हणाले.
या चुकीच्या धोरणांमुळे भाजपमधील काही कार्यकर्ते पक्षातून बाहेर पडून इतर पक्षांतून निवडणूक लढवून निवडून आले. तसेच नगरपालिका निवडणुकीदरम्यान मित्रपक्ष शिवसेना (शिंदे गट) यांच्याशी युतीबाबत जिल्हा नेतृत्वाने संभ्रम निर्माण केल्याचा आरोपही त्यांनी केला. सुरुवातीला युती न करण्याचे संकेत, नंतर युतीबाबत पत्रकार परिषद, आणि अखेरीस स्वतंत्र लढण्याचा निर्णय — या विस्कळीत रणनीतीमुळे भाजपचा पराभव झाला, असे मोंडकर म्हणाले.
राज्यात भाजप क्रमांक एकचा पक्ष असताना मालवणमध्ये मात्र जिल्हा नेतृत्वाच्या अकार्यक्षमतेमुळे आणि चुकीच्या राजकीय गणितांमुळे पक्षाची पिछेहाट होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात असल्याने पक्ष कोणत्या दिशेने जात आहे, हेच कळेनासे झाले असल्याचेही त्यांनी नमूद केले.
“आवाज उठवला असता ‘पटत नसेल तर राजीनामा द्या’ असे उत्तर मिळाले. त्यामुळे मी आधीच राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र इतर कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे नगरपालिका निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत थांबलो. आता मात्र कार्यकर्त्यांचा केवळ निवडणुकीपुरता वापर करून घेण्याची पद्धत सहन होणारी नाही,” असे स्पष्ट करत बाबा मोंडकर यांनी आपल्या राजीनाम्याची भूमिका मांडली.
भविष्यात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांत पुन्हा कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ नये, यासाठी आपण बाजूला होत असल्याचे सांगत, इतकी वर्षे तन-मन-धन अर्पण केलेल्या पक्षातून बाहेर पडताना अत्यंत दुःख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.







