मालवण (प्रतिनिधी):
कुडाळ तालुक्यातील सोनवडे तर्फ हवेली येथील कर्ली नदीपात्रात सुरू असलेल्या बेकायदेशीर वाळू उपशामुळे नदीकिनाऱ्याची मोठ्या प्रमाणावर धूप होत असून, किनाऱ्यालगत असलेल्या ग्रामदैवत आर्या दुर्गा देवीच्या मंदिराला गंभीर धोका निर्माण झाला आहे. हा वाळू उपसा तातडीने थांबवण्यात यावा, अन्यथा २६ जानेवारी रोजी उपोषणास बसण्याचा इशारा माजी सरपंच महीपाल धुरी यांनी कुडाळ तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.
सोनवडे तर्फ हवेली गावातील कर्ली नदीकिनारी असलेले आर्या दुर्गा देवीचे मंदिर हे गावाचे प्रमुख देवस्थान आहे. काही वर्षांपूर्वी मंदिर व नदी यामध्ये ३०० ते ४०० फूट अंतर होते. मात्र, सातत्याने होत असलेल्या नदीधूपामुळे हे अंतर आता केवळ १५ ते २० फूटांवर येऊन ठेपले आहे. विशेष म्हणजे मंदिरालगतच्या नदीपात्रात रात्रीच्या वेळी बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
वाळू उपसा करू नये, अशी विनंती भाविक व ग्रामस्थांकडून वारंवार करण्यात येत असतानाही वाळू उपसा करणारे ऐकत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. या ठिकाणी वाळू उपसा सुरू राहिल्यास मंदिर केव्हाही नदीपात्रात कोसळण्याची शक्यता असून, त्यामुळे भाविकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
देवीच्या मंदिराच्या भिंतीलगतपासून नदीकिनाऱ्यापर्यंत जमिनीत मोठ्या प्रमाणावर भेगा पडल्या असून, पावसाळ्यात ही जमीन दबली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे मंदिराला मोठा धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या गंभीर स्थितीची माहिती असूनही संबंधित वाळू व्यवसायिक रात्रीच्या अंधारात मंदिरालगत वाळू काढत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
मंदिराला निर्माण झालेला धोका लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने वाळू उपसा थांबवावा आणि दोषींवर कठोर कारवाई करावी. अन्यथा २६ जानेवारी रोजी भाविक व ग्रामस्थांसह उपोषणास बसणार असल्याचा इशारा माजी सरपंच महीपाल धुरी यांनी दिला असून, प्रशासनाने या प्रकरणात न्याय द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.







