मालवण (प्रतिनिधी):
मालवणमधील एका हॉटेल व्यावसायिकास कॉपीराईट नियमांचा भंग केल्याचा आरोप करत तब्बल ५० लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करणारी नोटीस प्राप्त झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हॉटेलमध्ये स्पीकरवर वाजवण्यात येणाऱ्या गाण्यांसाठी परवानगी घेतली नसल्याचा आरोप या नोटीसमध्ये करण्यात आला आहे.
या प्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन वाळके यांनी पत्रकार परिषदेत दिली. संबंधित हॉटेल व्यावसायिकास काही दिवसांपूर्वी एक पत्र प्राप्त झाले होते. त्या पत्रात हॉटेलमध्ये वाजवण्यात येणाऱ्या गाण्यांचे कॉपीराईट फोनोग्राफिक परफॉर्मन्स लिमिटेड (PPL), अंधेरी – मुंबई या संस्थेकडे असून, कंपनीची परवानगी न घेता गाणी लावल्यामुळे नियमांचा भंग झाला आहे. त्यामुळे तुमच्यावर कायदेशीर कारवाई का करू नये, असा सवाल त्या पत्रात उपस्थित करण्यात आला होता.
यानंतर काही दिवसांतच एका महिला वकिलाच्या नावे कायदेशीर नोटीस प्राप्त झाली. या नोटीसमध्ये कॉपीराईट कायद्याचा भंग केल्याप्रकरणी ५० लाख रुपये नुकसानभरपाई द्यावी, अन्यथा पुढील कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी धमकीवजा मागणी करण्यात आली होती. या प्रकारामुळे भयभीत झालेल्या हॉटेल व्यावसायिकाने तातडीने आपल्या वकिलांचा सल्ला घेतला असून, जिल्हा व्यापारी महासंघाचेही लक्ष या प्रकरणाकडे वेधले आहे.
या संपूर्ण प्रकाराची गंभीर दखल जिल्हा व्यापारी महासंघाने घेतली असून, हा प्रकार फसवणूक व आर्थिक लुबाडणुकीच्या उद्देशाने करण्यात आल्याचा संशय महासंघाने व्यक्त केला आहे. सदर नोटीसीला कोणताही ठोस कायदेशीर आधार नसल्याचेही महासंघाचे म्हणणे आहे.
दरम्यान, अशा स्वरूपाच्या नोटीसींना कोणत्याही परिस्थितीत थेट उत्तर देऊ नये, अन्यथा मोबाईल हॅकिंग, ऑनलाइन फसवणूक किंवा बँक खात्यातून रक्कम लंपास करण्याचे प्रकार घडू शकतात, असा इशारा नितीन वाळके यांनी दिला आहे. तसेच अशा प्रकारच्या नोटीसा अन्य व्यापारी किंवा व्यावसायिकांना प्राप्त झाल्यास त्यांनी तात्काळ जिल्हा व्यापारी महासंघाशी संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.






