मालवण | प्रतिनिधी
गतवर्षी मालवण, वायरी, तारकर्ली व देवबाग या प्रमुख मार्गांवर भूमिगत वीज वाहिनी टाकण्याचे काम करण्यात आले होते. या कामादरम्यान रस्त्यांची मोठ्या प्रमाणात खोदाई झाल्याने नागरिक, वाहनचालक व पर्यटकांना त्रास सहन करावा लागत होता. या रस्त्यांच्या तातडीच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आमदार निलेश राणे यांनी सातत्याने पाठपुरावा करून केली होती. त्यांच्या प्रयत्नांमुळे वीज विभागाच्या माध्यमातून सुमारे १ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी डिपॉझिट करण्यात आला असून लवकरच रस्त्यांची दुरुस्ती पूर्ण केली जाणार आहे.
मालवण–वायरी–तारकर्ली–देवबाग हे मार्ग पर्यटनाच्या दृष्टीने तसेच दैनंदिन वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचे असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. भूमिगत वीज वाहिनी टाकताना रस्त्यांची खोदाई झाल्याने अपघाताचा धोका वाढला होता. त्यामुळे वाहनचालक, स्थानिक नागरिक व पर्यटकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी रस्त्यांची डागडुजी तात्काळ करणे आवश्यक असल्याचे आमदार निलेश राणे यांनी स्पष्ट केले होते.
त्यांच्या सूचनेनुसार वीज विभागाने सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे डिपॉझिट केला आहे. या निधीतून संबंधित रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम लवकरच हाती घेऊन ते पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यामुळे नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुलभ होणार असून परिसरातील वाहतूक कोंडी आणि गैरसोयी दूर होतील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.





