मालवण | प्रतिनिधी
पर्यावरण संरक्षण तसेच कांदळवन संवर्धनाविषयी लहान वयातच जनजागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने इकोफोक्स व्हेंचर्स, कांदळवन प्रतिष्ठान आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय बालनाट्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात होणार आहे. या स्पर्धेसाठी अभियान आम्ही मालवणी, हॉटेल चैतन्य व उबंटू कॅफे, पिंटो सी फूड आणि एशियन इन्फोटेक हे सहप्रायोजक आहेत, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.
मालवण येथील चैतन्य हॉटेलमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत या स्पर्धेची सविस्तर माहिती देण्यात आली. यावेळी अभियान आम्ही मालवणीचे अध्यक्ष रुजारिओ पिंटो, चैतन्य हॉटेलचे नितीन वाळके, अजय मुणगेकर आदी उपस्थित होते.
यावेळी नितीन वाळके यांनी सांगितले की, जागतिक पाणथळ जागा दिनानिमित्त गेल्या काही वर्षांपासून या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, मुलांमध्ये पर्यावरण, पाणथळ जागा तसेच त्यामधील कांदळवनांचे महत्त्व याबाबत जागरूकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे. यावर्षी स्पर्धेसाठी ‘खाजण (वेटलँड) जैवविविधतेचे साजण’, ‘नेमेचि येतो मग पावसाळा – हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा’ आणि ‘सागरा(चा) प्राण तळमळला?’ असे तीन विषय देण्यात आले आहेत.
स्पर्धेत प्रथम क्रमांकास रुपये १२,०००/- चषक व प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास रुपये ८,०००/- चषक व प्रमाणपत्र, तृतीय क्रमांकास रुपये ५,०००/- चषक व प्रमाणपत्र, तर उत्तेजनार्थ रुपये २,०००/- चषक व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. याशिवाय उत्कृष्ट लेखन व उत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रत्येकी रुपये ५००/- चषक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. पुरुष व स्त्री अभिनय तसेच तांत्रिक अंगासाठी प्रथम तीन क्रमांकांना चषक, प्रमाणपत्र व आकर्षक भेटवस्तू दिल्या जाणार आहेत.

दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेस सुरुवात होऊन सायंकाळी बक्षीस वितरण समारंभ होणार आहे. स्पर्धेसाठी प्रथम येणाऱ्या दहा संघांना प्राधान्य देण्यात येईल. प्रत्येक संघात किमान सहा व कमाल दहा विद्यार्थी असणे आवश्यक आहे. मालवण तालुक्याबाहेरून येणाऱ्या संघास रुपये १,२००/- प्रवास भत्ता देण्यात येईल.
इच्छुक संघांनी प्रवेश फी रुपये २००/- व अनामत रक्कम रुपये १,०००/- सहित आपली नावे दि. ३१ जानेवारीपर्यंत नोंदवावीत. नावनोंदणी व अधिक माहितीसाठी नितीन वाळके (९४२२०५४५८८) व रवींद्र तळाशीलकर (९४२२५८४८६२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.





