मालवण | प्रतिनिधी
वायरी-भूतनाथ गावच्या किनारपट्टीवर कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनल्यानंतर जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी कचऱ्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास उपोषणाचा इशारा दिला होता. या इशाऱ्याची दखल घेत वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने तातडीने कारवाई करत किनारपट्टी परिसरात सूचना फलक लावून कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
वायरी-भूतनाथ येथील किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा, बाटल्या तसेच टाकावू अन्नपदार्थ टाकले जात होते. यामुळे किनारपट्टीचे नैसर्गिक सौंदर्य बिघडले असून परिसरात अस्वच्छता पसरली होती. या बाबीकडे जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांनी ग्रामपंचायतीचे लक्ष वेधले होते.
त्यानंतर वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीने तत्काळ दखल घेत किनारपट्टीवरील कचरा उचलून स्वच्छता मोहीम राबवली आहे. तसेच या ठिकाणी ग्रामपंचायतीकडून सूचना फलक लावण्यात आला असून, सदर परिसरात कोणत्याही प्रकारचा कचरा टाकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.
सूचना फलकानुसार, या परिसरात कचरा टाकणाऱ्या व्यक्तीवर ५०० रुपये दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच कचरा टाकणारी व्यक्ती निदर्शनास आणून देणाऱ्यास २०० रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची माहिती वायरी-भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच भगवान लुडबे यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या या निर्णयामुळे किनारपट्टी स्वच्छ व सुंदर राहण्यास मदत होणार असल्याचे ग्रामस्थांकडून अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






