मालवण | प्रतिनिधी
पोलीस रेझिंग डे सप्ताहाच्या निमित्ताने कांदळगाव येथील ओझर विद्यामंदिर या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी मालवण पोलीस स्टेशनला शैक्षणिक भेट देत पोलीस स्टेशनच्या प्रत्यक्ष कामकाजाचा जवळून अनुभव घेतला. या क्षेत्रभेटीत विद्यार्थ्यांनी पोलीस प्रशासनाची कार्यपद्धती, जबाबदाऱ्या व आधुनिक साधनसामग्री यांची सविस्तर माहिती घेतली.
पोलीस स्थापना दिन अर्थात रेझिंग डे निमित्त मालवण पोलीस स्टेशनच्यावतीने रेझिंग डे सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहांतर्गत पोलीस खात्यातील विविध शस्त्रास्त्रांचे प्रदर्शन व मार्गदर्शन, घातक पदार्थ व बॉम्ब शोधक यंत्रांचे प्रात्यक्षिक, पोलीस स्टेशन व्यवस्थापन व दैनंदिन कारभाराची माहिती तसेच पोलीस बँड पथकाचे वादन असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमांची प्रत्यक्ष ओळख विद्यार्थ्यांना व्हावी, यासाठी ग्रामीण भागातील ओझर विद्यामंदिर प्रशालेला विशेष निमंत्रण देण्यात आले होते.
या क्षेत्रभेटीत ओझर विद्यामंदिरचे ४८ विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यांच्यासमवेत ज्येष्ठ शिक्षक ए. ए. शेर्लेकर, एस. जे. सावंत तसेच प्रभारी मुख्याध्यापक उपस्थित होते.
मालवण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्री. भोसले यांनी विद्यार्थ्यांना पोलीस निरीक्षक कक्ष, ठाणे अंमलदार व बिनतारी संदेश कक्ष, अधिकारी कक्ष, बारनिशी व कारकून कक्ष, ट्रेझरी, पोलीस कोठडी तसेच गोपनीय विभाग व गुन्हे संकलन व गुन्हे अन्वेषण विभागाच्या कामकाजाची माहिती दिली. पोलीस दलातील आधुनिक शस्त्रास्त्रांबाबत पोलीस हवालदार सुधीर लोंढे यांनी तर बॉम्ब शोधक यंत्रांबाबत पोलीस हवालदार संजय शिरटीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांना सामाजिक सुरक्षा, सजगता आणि सामाजिक शांतता राखण्याबाबतच्या कर्तव्यांची जाणीव करून देण्यात आली.
या कार्यक्रमास मालवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मारुती जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस उपनिरीक्षक श्री. भोसले, बॉम्ब शोधक नाशक पथकाचे पोलीस हवालदार संजय शिरटीकर, शस्त्र प्रशिक्षक पोलीस हवालदार सुधीर लोंढे, श्री. पाटील, महिला पोलीस हवालदार सुप्रिया पवार, भरोसा सेल (सिंधुदुर्ग, ओरोस) येथील महिला पोलीस हवालदार साक्षी खोपकर, डायल ११२ (सिंधुदुर्ग, ओरोस) येथील पोलीस हवालदार रागिणी पालकर, पोलीस बँड विभाग सिंधुदुर्गचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गोन्साल्विस व त्यांचे सहकारी उपस्थित होते.
या उपक्रमात सहभागी करून घेतल्याबद्दल ओझर विद्यामंदिरच्या प्रभारी मुख्याध्यापकांनी मालवण पोलीस स्टेशनचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोलीस हवालदार सुशांत पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक श्री. भोसले यांनी मानले.






