मालवण | प्रतिनिधी
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना (एनसीसी) विभागांतर्गत प्रशिक्षण घेत असलेल्या चार विद्यार्थ्यांची भारतीय सैन्याच्या अग्निवीर योजनेत निवड झाली असून ही बाब महाविद्यालय, एनसीसी विभाग तसेच कृ. सि. देसाई शिक्षण मंडळासाठी अभिमानास्पद ठरली आहे.
कला शाखेत शिक्षण घेत असलेले आदेश हाके, बिरू खरात, विवेक पाटील आणि शंकर पाटील हे चारही विद्यार्थी एनसीसी कॅडेट्स असून, त्यांनी कठोर परिश्रम, शिस्तबद्ध प्रशिक्षण आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग कॉलेजच्या एनसीसी विभागाचे प्रमुख असोसिएट एनसीसी ऑफिसर लेफ्टनंट प्राध्यापक डॉ. एम. आर. खोत यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अग्निवीरमध्ये निवड झालेल्या या चारही विद्यार्थ्यांची घरची परिस्थिती अत्यंत बेताची असून प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेत त्यांनी सैन्यात भरती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते. हे स्वप्न साकार करण्यासाठी त्यांनी मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात एनसीसीमध्ये प्रवेश घेतला आणि सातत्यपूर्ण मेहनतीमुळे त्यांचा उद्देश सफल झाला, असे एनसीसी विभाग प्रमुख प्रा. डॉ. एम. आर. खोत यांनी सांगितले.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे विद्यमान प्रभारी प्राचार्य कैलास राबते, माजी प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर, एनसीसीचे सर्व कॅडेट्स, प्राध्यापक व कर्मचारी वर्ग तसेच कृ. सि. देसाई शिक्षण संस्थेचे अध्यक्ष किरण ठाकूर, कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण, सेक्रेटरी गणेश कुशे व इतर पदाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
याशिवाय मालवण पोलीस निरीक्षक मारुती जगताप, मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांनीही या यशाबद्दल अभिनंदन करत मालवणसाठी ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे मत व्यक्त केले. तसेच ५८ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अजय राजशेखर (तामिळनाडू), लेफ्टनंट कर्नल तनुज मंडलिक, सुभेदार मेजर सुधाकर कुलदीप कर व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही या चारही अग्निवीरांची प्रशंसा करून शुभेच्छा दिल्या.





