मालवण | प्रतिनिधी
अंध अपंग बांधवांच्या दैनंदिन जीवनात आत्मनिर्भरता निर्माण करण्याच्या उद्देशाने मालवण येथील बॅ. नाथ पै सेवांगण येथे आयोजित कार्यशाळेदरम्यान मालवण लायन्स क्लबच्या वतीने अन्नदान सेवा उपक्रम राबविण्यात आला.
महात्मा गांधी सेवा संघ संचलित सिंधुदुर्ग जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व साईकृपा अपंगशक्ती बहुउद्देशीय शिक्षण संस्था, कसाल यांच्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेत सहभागी झालेल्या अंध अपंग बांधवांसाठी लायन्स क्लबतर्फे अन्नदान करण्यात आले.
या सेवाभावी उपक्रमासाठी लायन्स क्लबच्या सदस्या फेनी फर्नांडीस यांनी आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या या योगदानाबद्दल अंध अपंग बांधव तसेच आयोजक संस्थांच्या वतीने मालवण लायन्स क्लबचे आभार मानण्यात आले.
यावेळी मालवण लायन्स क्लबच्या अध्यक्षा अनुष्का चव्हाण, खजिनदार पूनम चव्हाण, सदस्या फेनी फर्नांडीस, अंजली आचरेकर, वैशाली शंकरदास, नंदिनी गावकर, उमेश शिरोडकर यांच्यासह माजी नगरसेविका सुनीता जाधव, सामाजिक कार्यकर्ते दादा वेंगुर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सामाजिक बांधिलकी जपत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात आले.






