मालवण : प्रतिनिधी
“आगीनझाड” या गाजलेल्या कथासंग्रहाच्या पंचविशीपूर्तीनिमित्त आयोजित केलेला रौप्यपूर्ती सोहळा रविवारी मालवण येथे साहित्यप्रेमींसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला. एका बाजूला अथांग निळाशार समुद्र आणि त्याच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या बॅ. नाथ पै सेवांगणमधील दादासाहेब शिखरे सभागृहात सिंधुदुर्गातील एकापेक्षा एक सरस साहित्यरत्ने एकत्र जमली होती. जणू सागराच्या ओंजळीतूनच ही रत्ने उड्या घेत येथे आली असावीत, असे दृश्य उपस्थितांना भारावून टाकणारे होते.
“आगीनझाड” या कथासंग्रहाच्या रौप्यपूर्तीचा हा सोहळा संकल्पनेपासून सादरीकरणापर्यंत वेगळेपण जपणारा होता. आजवर वास्तू, संस्था किंवा स्थळांच्या पंचविशीचे कार्यक्रम पाहिले असले, तरी एखाद्या कथासंग्रहाच्या पंचविशीचा असा देखणा सोहळा दुर्मीळच. या अभिनव संकल्पनेला मूर्त रूप देणाऱ्या लेखिका वैशाली पंडीत यांना यावेळी उपस्थितांनी मनापासून दाद दिली.
या कार्यक्रमाला स्वतः लेखिका वैशाली पंडीत, राष्ट्रीय पुरस्कार विजेते नाट्य व चित्रपट अभिनेते अभय खडपकर, कोकण मराठी साहित्य परिषदेच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता किर, ॲड. अपर्णा परांजपे प्रभू, गझलकारा माधुरी जोशी, कवयित्री सई लळीत, अनुवादक वंदना करंबेळकर, प्रा. डॉ. सुमेधा नाईक, कवी अमेय पंडीत आदी मान्यवर साहित्यिक व विचारवंत उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने सभागृह अक्षरशः गच्च भरले होते.
सभागृहाची नेटकी सजावट, सुयोग्य बैठक व्यवस्था आणि विशेषतः प्रवेशद्वारावर उभारलेली “आगीनझाड”ची कल्पक प्रतीकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. अनेकांनी येथे आठवणींचे फोटो काढत हा क्षण जपून ठेवला.
विषयाला साजेसे, खुमासदार सूत्रसंचालन डॉ. सुमेधा नाईक यांनी केले. नेमकी, आटोपशीर आणि आशयघन मनोगते यामुळे संपूर्ण कार्यक्रमात एकही क्षण कंटाळवाणा ठरला नाही. परिसंवादात सहभागी झालेल्या वंदना करंबेळकर, अपर्णा परांजपे प्रभू, अभय खडपकर आणि नमिता किर या सर्व वक्त्यांनी अभ्यासपूर्ण, श्रोत्यांच्या पचनी पडणारी मांडणी केली.
ॲड. अपर्णा परांजपे प्रभू यांनी सादर केलेली “आगीनझाड” ही कथा ऐकताना जणू कुणी कथा वाचत नसून डोळ्यांसमोर चित्रफीतच सुरू आहे, असा भास होत होता. तर अभय खडपकर यांचे समाजभान जपणारे, सहजसुंदर भाषण कार्यक्रमाची उंची अधिकच वाढवणारे ठरले. असा नटश्रेष्ठ आणि संवेदनशील कलाकार प्रत्यक्ष ऐकण्याचे भाग्य लाभणे, हे उपस्थितांसाठी विशेष ठरले.
कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात लेखिका वैशाली पंडीत यांची घेतलेली मुलाखत नवोदित लेखकांसाठी जणू एक कार्यशाळाच ठरली. त्यांच्या लेखनप्रवासातील अनुभव, चिंतन आणि प्रामाणिक मांडणीने अनेकांना प्रेरणा दिली.
पंडीत कुटुंबाचे लाघवी आदरातिथ्य, मालवणचे प्रसन्न वातावरण आणि या साहित्यिक सोहळ्याच्या निमित्ताने लाभलेला ज्ञानखजिना — एकूणच “आगीनझाड” कथासंग्रहाच्या पंचविशीचा हा रविवार सर्वार्थाने उपस्थितांना समृद्ध करून गेला.





