सिंधुदुर्गनगरी |
शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील शेवटच्या लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच अग्रेसर राहिला आहे. ही कामगिरी अधिक गतीने पुढे नेत सर्व यंत्रणांच्या समन्वयातून सिंधुदुर्ग जिल्ह्याला राज्यात प्रथम क्रमांकावर आणणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.
मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण तसेच वैयक्तिक लाभ वितरण व सन्मान सोहळा पालकमंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर, पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शीतल पुंड, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राणे म्हणाले की, जिल्हा परिषदेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांमुळे वैयक्तिक लाभार्थ्यांना थेट लाभ मिळत असून ग्रामीण अर्थव्यवस्था अधिक सक्षम होत आहे. या योजनांमुळे ग्रामीण भागातील नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत असून विकासाचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचत आहे. प्रत्येक निर्देशांकात सिंधुदुर्ग जिल्हा पुढे राहील, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शासनाने उपलब्ध करून दिलेल्या निधीचा योग्य, पारदर्शक व परिणामकारक वापर, वेळेत कामे पूर्ण करणे आणि नवोपक्रमांना प्रोत्साहन देणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सकारात्मक मानसिकतेने, लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श ठेवून काम केल्यास सिंधुदुर्गचा सर्वांगीण विकास निश्चित साध्य होईल, असेही त्यांनी नमूद केले.
पालकमंत्री राणे यांनी सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रणालीचा वापर करणारा सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला जिल्हा ठरत आहे, ही अभिमानाची बाब आहे. एआयच्या प्रभावी वापरामुळे प्रशासनाच्या कामकाजात गती, अचूकता व पारदर्शकता वाढली असून प्रत्यक्ष प्रगती स्पष्टपणे दिसून येत आहे. योजनांच्या यशकथा समाजापर्यंत पोहोचविल्यास इतर नागरिकांनाही लाभ घेण्याची प्रेरणा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
जिल्हा वार्षिक योजनेतून मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात येत असून हा निधी जनतेच्या हक्काचा आहे, त्यामुळे प्रत्येक रुपया जनहितासाठी खर्च होणे आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. पालकमंत्री या नात्याने सिंधुदुर्गच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न करत राहणार असल्याचा त्यांनी पुनरुच्चार केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र खेबुडकर यांनी केले तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. परब यांनी आभार मानले.
यावेळी विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना लाभ वितरित करण्यात आला. लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार १३ पात्र उमेदवारांना नियुक्ती आदेश, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुलांच्या चाव्यांचे वितरण, आयुष्मान कार्ड वाटप, वैयक्तिक शौचालय प्रोत्साहन निधी, सेस अनुदानातून मागासवर्गीयांना शिलाई मशीनसाठी अर्थसहाय्य, तसेच घरकुलासाठी अर्थसहाय्य देण्यात आले.






