मालवण | प्रतिनिधी :
कट्टा येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक बापूभाई शिरोडकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ देण्यात येणारा बापूभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार यावर्षी चौके गावचे सुपुत्र श्री. गोपाळ सहदेव चौकेकर यांना जाहीर करण्यात आला आहे. समाजसेवा, लोकहित आणि विकासाभिमुख कार्यासाठी दिला जाणारा हा पुरस्कार शनिवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता चौके येथील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयाच्या सभागृहात प्रदान करण्यात येणार आहे.
या पुरस्कार वितरण समारंभाला चौके पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई येथील स्थानिक समितीचे अध्यक्ष बिजेंद्र गावडे, ज्येष्ठ शिक्षक सदाशिव गावडे गुरुजी, तसेच सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांच्या प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
श्री. गोपाळ चौकेकर हे चौके गावचे रहिवासी असून गेल्या अनेक वर्षांपासून ते सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. ते चौके येथील भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालयात कर्मचारी म्हणून कार्यरत असून, स्वभावाने अत्यंत नम्र आणि मदतीचा हात पुढे करणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची ओळख आहे.
सन २००७ मध्ये ते मालवण पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. या काळात त्यांनी सर्वसामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न पंचायत समितीत प्रभावीपणे मांडून त्यांची सोडवणूक करून घेतली. सार्वजनिक विकासाच्या विविध योजना आपल्या भागात यशस्वीरीत्या राबवण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना अर्थसहाय्य, संजय गांधी निराधार योजना यांचा लाभ अनेक गरजू नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.
चौके गावचे लोकनियुक्त सरपंच म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले असून, त्यांच्या कार्याची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्हा अपंग संस्था तर्फे त्यांना आदर्श सरपंच पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. जिल्हा व तालुका पातळीवरील विविध समित्यांवर सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारीने काम केले आहे.
त्यांच्या या प्रदीर्घ आणि निस्वार्थ समाजकार्याचा गौरव म्हणून बॅ. नाथ पै सेवांगण, कट्टा शाखेच्या वतीने देण्यात येणारा बापूभाई शिरोडकर स्मृती आदर्श समाजसेवक पुरस्कार यंदा त्यांना जाहीर झाला आहे. विशेष म्हणजे या पुरस्काराचे हे रौप्य महोत्सवी – २५ वे वर्ष आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन बापू तळवडेकर, वैष्णवी लाड, शाम पावसकर, किशोर शिरोडकर, दीपक भोगटे आणि विकास म्हाडगुत यांनी केले आहे.






