मालवण | प्रतिनिधी : मालवण नगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यकाळात कचरा व्यवस्थापन व विविध विकासकामांच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप उबाठा शिवसेना पक्षाचे नगरपालिकेतील गटनेते महेंद्र म्हाडगुत यांनी केला आहे. नगरसेवक नसतील, की प्रशासन मनमानी कारभार करते, हेच या प्रकरणातून उघड झाले असून जनतेच्या पैशांचा हा अपहार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मालवण येथील उबाठा शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला. यावेळी शहरप्रमुख बाबी जोगी, नगरसेवक तपस्वी मयेकर, नगरसेविका अनिता गिरकर, माजी नगरसेविका पूजा करलकर, ॲड. सुमित जाधव, तेजस नेवगी, दत्ता पोईपकर, सुरेश मडये आदी उपस्थित होते.
कचरा व्यवस्थापन : खर्च कोट्यांत, प्रत्यक्ष काम शून्य
महेंद्र म्हाडगुत यांनी सांगितले की, मालवण नगरपालिकेच्या गेल्या चार वर्षांच्या प्रशासकीय राजवटीत कचरा विलगीकरण व खतनिर्मितीसाठी लाखो रुपयांच्या निविदा काढण्यात आल्या. मात्र प्रत्यक्षात खत निर्मिती शून्य आहे. उबाठा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी डम्पिंग यार्डची प्रत्यक्ष पाहणी केली असता तेथील यंत्रसामग्री बंद अवस्थेत आढळून आली.
कागदोपत्री १६ कामगार दाखवले जात असताना प्रत्यक्षात फक्त ५ ते ६ कामगार कार्यरत असल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे, नगरपालिकेत हजेरी दाखवले जाणारे काही कामगार शहरातील खासगी मॉल्स व दुकानांमध्ये काम करत असल्याचा संशय असून कामगारांच्या नावावर पैसे उचलून ते परत घेतले जात असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
आकडेच संशयास्पद
२०२२–२३ (६ महिने) :
खर्च दाखवला – १४ लाख ५८ हजार,
प्रत्यक्ष खत निर्मिती – शून्य
२०२४ वर्ष : निविदा – ५७ लाख ५६ हजार,
अदा रक्कम – ३५ लाख,
प्रत्यक्ष काम – शून्य
इतका खर्च होऊनही कचऱ्याचे ढीग तसेच का आहेत? ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ का दिली जाते? डम्पिंग यार्डमधील कचरा केवळ दुसऱ्यांच्या जागेत टाकण्याचेच काम सुरू असून आतापर्यंत खर्च झालेला पैसा नेमका कुठे जिरला? असा सवालही म्हाडगुत यांनी उपस्थित केला.
आडवण दलित वस्तीतील पाणीपुरवठ्यातही गैरप्रकार?
मालवण शहरातील आडवण दलित वस्तीतील पाणीपुरवठा व पंप बसवण्याच्या कामातही मोठा गैरप्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला.ज्या कामासाठी १ लाख ४७ हजार रुपयांची निविदा काढण्यात आली, ते काम प्रत्यक्षात ४० ते ५० हजारांत होणारे असल्याचे म्हाडगुत म्हणाले. वायरचे अंदाजपत्रक अवास्तव असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले.
पाहणीदरम्यान पंप व पॅनल आधीच बसवलेले असून पाणीपुरवठा सुरू असल्याचे आढळून आले. काम आधीच झाले असेल, तर निविदा कोणासाठी काढली? हा प्रकार म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या संगनमताने चाललेला भ्रष्टाचाराचा कळस असल्याचा आरोप त्यांनी केला.
नगरसेवक का हवेत, याचेच हे उत्तर
“नगरसेवक कशाला हवेत?” असा प्रश्न विचारणाऱ्यांना हे प्रकरणच उत्तर देणारे आहे. प्रशासकीय काळात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी आणि जनतेच्या हक्काचे संरक्षण करण्यासाठी निवडून आलेले नगरसेवक आवश्यक आहेत, असे म्हाडगुत म्हणाले.आम्ही सध्या विरोधी पक्षात असलो, तरी मालवणच्या जनतेला दर्जेदार सेवा मिळवून देण्यासाठी प्रशासनावर अंकुश ठेवणार आहोत. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई होईपर्यंत शिवसेना (उबाठा) पाठपुरावा थांबवणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी यावेळी दिला.





