सिंधुदुर्गनगरी | दि. १० जानेवारी २०२६
आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिक यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गनगरी येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत महत्त्वाची नियोजन बैठक पार पडली. यात्रेदरम्यान लाखो भाविकांची गैरसोय होऊ नये, तसेच सुरक्षित, शिस्तबद्ध व सुविधायुक्त यात्रा पार पडावी यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीत यात्रेच्या कालावधीत मोबाईल नेटवर्क सुरळीत ठेवणे, पुरेशी पाणीपुरवठा व्यवस्था, अतिरिक्त बस फेऱ्या व सुयोग्य पार्किंग व्यवस्था, रस्त्यांवरील स्ट्रीट लाईटची व्यवस्था, स्वतंत्र मीडिया कक्षाची निर्मिती, तसेच भाविकांसाठी सुलभ, सुरक्षित व नियोजित दर्शन व्यवस्था या प्रमुख मुद्द्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित विभागांना याबाबत तात्काळ व प्रभावी अंमलबजावणीचे निर्देश देण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलीस अधीक्षक मोहन दहीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, अपर जिल्हाधिकारी शुभांगी साठे, निवासी जिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे, नियोजन अधिकारी बुधावले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत तसेच आंगणेवाडी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







