मालवण | प्रतिनिधी : मुंबई येथील प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉ. आशिष देशपांडे यांचे आज, शनिवार १० जानेवारी २०२६ रोजी मालवण येथे आगमन झाले आहे. अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस, मालवण संस्थेच्या २५ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात होणाऱ्या जनजागृती सभेत ते उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.
दारूच्या व्यसनामुळे निर्माण होणाऱ्या मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक समस्यांवर डॉ. देशपांडे सखोल मार्गदर्शन करणार असून, व्यसनमुक्तीच्या दिशेने सकारात्मक बदल कसा साधता येईल, याबाबत ते उपस्थितांना प्रेरित करणार आहेत.
ही जनजागृती सभा मालवण येथील हॉटेल एक्झॉटिका, धुरीवाडा, कुरण येथे आज, १० जानेवारी रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला मालवण शहर व परिसरातील नागरिकांनी, युवकांनी, पालकांनी तसेच व्यसनमुक्तीच्या चळवळीत रस असलेल्या सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे अल्कोहोलिक्स ॲनॉनिमस, मालवण संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे.






