कणकवली : प्रतिनिधी
गडनदीच्या प्रदूषणाचा प्रश्न गंभीर होत असतानाच कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर हे ‘एक्शन मोड’वर आले असून त्यांनी प्रशासनाला थेट कामाला लावले आहे. सोनगेवाडी व मराठा मंडळ परिसरातील निवासी संकुले व घरांमधून निघणारे सांडपाणी नाल्याद्वारे थेट गडनदीत सोडले जात असल्याची बाब समोर येताच नगराध्यक्ष पारकर यांनी कोणताही विलंब न करता प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि तातडीच्या उपाययोजनांचे स्पष्ट निर्देश दिले.
कलमठ ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनेद्वारे गडनदीतील पाण्यावर अवलंबून असलेला पाणीपुरवठा लक्षात घेता हे सांडपाणी नागरिकांच्या आरोग्यासाठी मोठा धोका ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. “नागरिकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असा ठाम इशारा देत नाल्याद्वारे नदीपात्रात जाणारे सांडपाणी तात्काळ थांबवण्याचे आदेश त्यांनी नगरपंचायतीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिले.
ग्रामपंचायत सदस्य धीरज मेस्त्री यांनी ही गंभीर बाब निदर्शनास आणल्यानंतर गुरुवारी सकाळी नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी गडनदीला जोडणाऱ्या नाल्याची पाहणी केली. या वेळी नगरपंचायत प्रशासकीय अधिकारी अमोल अघम, सचिन नेरकर, ध्वजा उचले, सोनाली खैरे, मनोज धुमाळे, विभव कंदरीकर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, माजी सरपंच आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
पाहणीदरम्यान नगराध्यक्ष पारकर यांनी नाल्यालगत ५० मीटर अंतरावर शोषखड्डे तयार करण्याचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले. तसेच नाल्याच्या कडेला वाढलेली झाडी व झुडपे हटवून परिसर स्वच्छ करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. गडनदीचे पाणी प्रदूषित होणार नाही याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
याशिवाय शहरवासीयांना शुद्ध पाणी मिळावे यासाठी नगरपंचायतीच्या नळपाणी योजनांवर जलशुद्धीकरण प्रकल्प (वॉटर ट्रीटमेंट प्लांट) बसविण्याचे नियोजन सुरू असल्याची माहिती देत नगराध्यक्ष पारकर यांनी दीर्घकालीन उपाययोजनांचाही आराखडा मांडला.
गडनदी प्रदूषणाच्या मुद्द्यावर केवळ चर्चा न करता थेट कृतीचा मार्ग स्वीकारत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी प्रशासनाची गती वाढवली असून, ‘नागरिकांचे आरोग्य प्रथम’ हा मंत्र घेऊन कणकवली नगरपंचायत काम करत असल्याचा स्पष्ट संदेश त्यांनी दिला आहे.





