मालवण | प्रतिनिधी
वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीच्या हद्दीतील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या उभाटवाडी येथील समुद्रकिनाऱ्यालगतच्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीने या रस्त्याच्या कडेला कचराकुंडी ठेवली असून त्याठिकाणी टाकलेला कचरा वाऱ्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी तसेच समुद्राकडे पसरत असल्याने गावकरी व पर्यटकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या गंभीर समस्येबाबत वारंवार निवेदने देऊनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे येत्या २६ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता सदर रस्त्यावरच जय भूतनाथ पर्यटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर उपोषणास बसतील, असा इशारा संस्थेचे अध्यक्ष देवानंद लुडबे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
जय भूतनाथ पर्यटन संस्थेने यासंदर्भात वायरी भूतनाथ ग्रामपंचायतीचे सरपंच, गटविकास अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच तहसीलदार यांना निवेदन सादर केले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, हा रस्ता समुद्रकिनाऱ्यालगत असल्याने पावसाळ्यात व भरतीच्या वेळी समुद्राचे पाणी येथे येते. यासाठी चार वर्षांपूर्वी बंधारा कम संरक्षक भिंत बांधण्यात आली असून, पर्यटकांच्या वाहनांसाठी पार्किंग तसेच बसण्यासाठी जागा उपलब्ध झाली आहे. या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक, लहान मुले व पर्यटक मोठ्या प्रमाणात बसत असतात.
मात्र याच ठिकाणी ठेवलेल्या कचराकुंडीमुळे परिसराचे विद्रूपीकरण झाले असून मोकाट गुरे, कुत्रे यांचा वावर वाढला आहे. त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता व आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. कचराकुंडीतील तसेच परिसरात पसरलेल्या कचऱ्याची नियमित विल्हेवाट लावणे ही ग्रामपंचायतीची जबाबदारी असताना याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप संस्थेने केला आहे.
यापूर्वीही जय भूतनाथ पर्यटन संस्थेमार्फत प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले असूनही कोणतीही कार्यवाही न झाल्याने अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. वेळेत योग्य उपाययोजना न झाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.






