मालवण | प्रतिनिधी
प्रतिकूल सामाजिक परिस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महिलांसाठी शिक्षणाची कवाडे खुली करून दिली. आज महिला प्रत्येक क्षेत्रात आत्मविश्वासाने वाटचाल करत आहेत, यामागे सावित्रीबाईंचा अपार संघर्ष आहे. या संघर्षाची जाणीव ठेवून प्रत्येक महिलेने सातत्याने प्रगती साधावी, असे प्रतिपादन ज्येष्ठ आशा स्वयंसेविका सिध्दाली गावडे यांनी केले.
चौके ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित सावित्रीबाई फुले जयंती कार्यक्रमात त्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ग्रामपंचायतीचे सरपंच पी. के. चौकेकर यांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य दुलाजी चौकेकर, विशाखा चौकेकर, अंगणवाडी सेविका सौ. सुकाळी, लिपिक सुविधा गावडे यांनी मनोगत व्यक्त करत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचा गौरव केला व उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामपंचायत अधिकारी श्री. सरमळकर यांनी केले. त्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक क्रांतीचा थोडक्यात आढावा घेत उपस्थितांचे स्वागत केले.
या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका सुहासिनी परब, केंद्र संचालिका मेघा वराडकर, ग्रामपंचायत कर्मचारी आनंद सावंत, गुरुप्रसाद गावडे, विनित आंबेरकर, श्री. गावडे यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.







