महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांची मराठी शब्दसंपदा आणि त्यांच्या वापराचे अफलातून टायमिंग यांची केवळ चर्चाच नसते तर तो अनेंकासाठी पुन्हा नव्याने संदर्भासहित स्पष्टीकरण असते.. कधी फर्दनवीस, तर कधी चौरंग , तर कधी भलतंच काही.. पण एखादाच शब्द प्रयोग पुढचे काही दिवस हॅशटॅग होऊन जातो.. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची महामुलाखत संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी घेतली. यावेळी एका प्रश्नांच्या उत्तरावेळी राज ठाकरे यांनी राजकारण्यांची तुलना ससाण्यांशी केली.
“हे सगळे ससाणे आहेत. मालकाच्या हातावर बसून पक्षी मारून आणणं हे ससाण्याचं काम असतं. तसंच आज सत्तेत बसलेले लोक दिल्लीतील मालकांच्या हातावर बसून आपल्याच माणसांना फोडण्याचे काम करत आहेत. स्वकीयांचा घात करणं हे केवळ पक्षांमध्येच नाही, तर सध्याच्या राजकारणाचे मुख्य सूत्र बनले आहे”, अशी टीका त्यांनी केली.
आज राज ठाकरे यांच्या मुलाखतीत केलेल्या “ते ससाणे आहेत, मालकासाठी काम करतात” या विधानानंतर सोशल मीडियावर आणि सर्च इंजिन्सवर ‘ससाणे पक्षी’ या शब्दाचा मोठ्या प्रमाणात शोध सुरू झाला आहे. राजकीय विधानातून वापरलेली ही उपमा नेमकी काय सूचित करते, ससाणे पक्षी कोणता असतो, त्याचा ‘मालक’ म्हणजे काय आणि त्याचा वापर कसा होतो – हे समजून घेणे आवश्यक आहे.
ससाणे पक्षी कोणता?
ससाणे हा शिकारी पक्ष्यांच्या गटातील एक पक्षी असून तो अतिशय तीक्ष्ण दृष्टी, वेगवान झेप आणि अचूक हल्ल्यासाठी ओळखला जातो. लहान पक्षी, उंदीर, साप यांची शिकार करणारा हा पक्षी निसर्गात स्वतंत्रपणे जगतो. मात्र इतिहासात आणि आजही काही देशांमध्ये ससाण्याचा वापर फाल्कनरी या पारंपरिक शिकारी पद्धतीत केला जातो.
‘मालक’ संकल्पना कशी आली?
फाल्कनरी पद्धतीत ससाण्याला प्रशिक्षित केले जाते. हा पक्षी शिकारीसाठी झेप घेतो, मात्र ती झेप पूर्णतः त्याच्या इच्छेने नसून प्रशिक्षकाच्या इशाऱ्यावर असते. त्यामुळे ससाणे हा स्वतंत्र निर्णय घेणारा नसून मालकाच्या नियंत्रणाखाली काम करणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. याच कारणामुळे ‘ससाणे’ या शब्दासोबत ‘मालक’ ही संकल्पना जोडली जाते.

राजकीय उपमेचा अर्थ
राज ठाकरे यांच्या विधानात ‘ससाणे’ हा शब्द पक्ष्यासाठी नसून राजकीय उपमा म्हणून वापरण्यात आल्याचे स्पष्ट केले जात आहे. राजकीय भाषेत ससाणे म्हणजे स्वतःचे स्वतंत्र मत न मांडता, कुणाच्या आदेशावरून आरोप, हल्ले किंवा वक्तव्य करणारी व्यक्ती असा अर्थ घेतला जातो. हल्ला करणारा समोर दिसतो, मात्र त्यामागील दिशा ठरवणारा दुसराच असतो, असा सूचक अर्थ या उपमेतून व्यक्त केला जातो.
विधानानंतर वाढले प्रश्न
या विधानानंतर “ससाणे असतील तर मालक कोण?” असा प्रश्न उपस्थित होत असून यामुळे राजकीय आरोप-प्रत्यारोपांना अधिक धार आली आहे. एका शब्दातून सत्ताकारणातील नियंत्रण, आदेशपालन आणि पडद्यामागील शक्ती यावर चर्चा सुरू झाल्याचे चित्र आहे.
राज ठाकरे यांच्या एका विधानामुळे ‘ससाणे’ हा शब्द केवळ पक्ष्यापुरता मर्यादित न राहता राजकीय प्रतीक म्हणून चर्चेत आला आहे. भाषेतील उपमा कशा प्रकारे राजकारणातील अर्थछटा उलगडतात, याचे हे ताजे उदाहरण ठरत आहे.






