मालवण तालुका उत्तर विभाग शिक्षण साहाय्यक समिती संचालित ओझर विद्यामंदिर, कांदळगाव या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा अत्यंत उत्साहात व आनंदी वातावरणात पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती मालवणचे माजी सभापती उदय परब होते. उद्घाटक म्हणून माजी मुख्याध्यापिका उषा मुरवणे, तर प्रमुख पाहुण्या म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ. शोभा पेडणेकर उपस्थित होत्या. स्नेहसंमेलनाचे उद्घाटन उषा मुरवणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. प्रशालेचे ज्येष्ठ शिक्षक अभय शेर्लेकर यांनी शाळेचा वार्षिक अहवाल सादर केला.
यावेळी शाळेचे कलाशिक्षक एस. जे. सावंत यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘वर्षा’ या हस्तलिखिताचे प्रकाशन उषा मुरवणे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते शैक्षणिक, क्रीडा व इतर उपक्रमांत वर्षभरात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध दात्यांकडून मिळालेली रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात आले.
शाळेसाठी विनामूल्य अध्यापन सेवा देणारे माजी विद्यार्थी विजय नातू यांचा कांदळगाव येथील माता-पालकांच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. तसेच प्रशालेच्या वतीने विजय नातू व अल्प मानधनावर सेवा देणाऱ्या महिला शिक्षिका सुनयना पवार-कदम यांचाही सन्मान करण्यात आला.
प्रमुख पाहुण्या सौ. शोभा पेडणेकर यांनी आपल्या मनोगतातून पंचक्रोशीतील पालकांनी आपल्या पाल्यांचा प्रवेश ओझर विद्यामंदिरमध्येच घ्यावा, असे आवाहन केले. कांदळगावचे सरपंच रणजीत परब, माजी विद्यार्थी व केंद्रप्रमुख प्रशांत पारकर, माजी विद्यार्थी व उद्योजक उमेश कोदे यांनीही शाळेच्या प्रगतीबद्दल गौरवोद्गार काढले. अध्यक्षीय भाषणात उदय परब यांनी ओझर विद्यामंदिरच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन सहकार्य करण्याचे आवाहन केले.
पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या सौ. शारदा मुळये, सौ. मधुरा परब, शालेय समिती सदस्य विजय कांबळी, श्रीराम परब, विजय शेलटकर, कांदळगाव पोलीस पाटील सौ. अक्षिता राणे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमासाठी पालक सौ. अपर्णा पालव, सौ. संजना कुऱ्हाडे तसेच कांदळगाव येथील माता-पालकांचे मोलाचे सहकार्य लाभले.
सायंकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांनी सादर केलेले विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरले. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे गायन कार्यक्रमही रंगले. या वेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ, पालक, शालेय समिती सदस्य विशाल राणे यांच्यासह अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारितोषिक वितरण समारंभाचे सूत्रसंचालन शिक्षक पांडुरंग राणे यांनी केले, तर आभार स्नेहसंमेलनप्रमुख प्रवीण पारकर यांनी मानले. संपूर्ण कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्नेहसंमेलन प्रमुख प्रवीण पारकर, शालेय सांस्कृतिक मंत्री अस्मी पारकर, लाजरी कांदळगावकर, मधुसूदन परुळेकर, प्रकाश खोडके, रविराज जाधव तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष मेहनत घेतली. सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लाजरी कांदळगावकर व तृप्ती परुळेकर यांनी केले.





